“दयानंद कला”च्या सात कलाकारांची इंद्रधनुष्य आतंरविद्यापीठ राज्यस्तरीय युवक महोत्सव प्रशिक्षणासाठी निवड
लातूर (प्रतिनिधी) : ग्रामीण पॉलिटेकनिक कॉलेज नांदेड येथे पार पडलेल्या राष्ट्रचेतना युवक मोहोत्सवात १६ पारितोषिकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावणाऱ्या दयानंद कला महाविद्यालयाच्या संघातील सात कलाकारांची इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक मोहोत्सवासाठी होणाऱ्या सराव शिबिरात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने निवड केली आहे.
इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक मोहोत्सव महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. यासाठी विद्यापीठाचा संघ निवडण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शिबीर आयोजीत केले असून यासाठी दयानंद कला महाविद्यालयाच्या ७ कलाकारांची निवड केली आहे. यात शास्त्रीय गायनात सुवर्णपदक पटकावणाऱ्या किशोरी मुरके, लोकसंगीतात सुवर्णपदक पटकावणाऱ्या संघातील शांतेश्वर सरवदे , नक्कल प्रकारात सुवर्णपदक आणि अभिनयाचे रौप्य पदक पटकावणारा ज्योतिबा बडे, वैयक्तिक व समूह गायन भारतीय, पाश्चात्य, कव्वालीमध्ये सुवर्ण, रौप्य पदक पटकावणाऱ्या संघातील प्रियंका बनसोडे, कमलाक्षी कुलकर्णी आणि पूजा माळी आणि रांगोळी कलाप्रकारात सुवर्ण पदक, व्यंग्यचित्र स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या इरफान पठाण यांचा समावेश आहे . या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करून नांदेडला रवाना करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर, सांस्कृतिक विभागाचे प्रभारी डॉ.अशोक वाघमारे, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक दिलीप नागरगोजे, प्रा. डॉ देवेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे , प्रा. सोमनाथ पवार, प्रा रविकिरण गळगे यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या.
