समता नगर खून प्रकरण, आरोपी अंबादास बिरादारला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
उदगीर (प्रतिनिधी) येथील बहुचर्चित समता नगर खून प्रकरणातील आरोपी अंबादास प्रकाश बिरादार याला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती श्री. अभय मंत्री यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला.
प्रकरणाची पार्श्वभूमी:-फिर्यादी हनुमंत कोंडीबा गायकवाड यांनी ६ सप्टेंबर २०२५ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, मयत पिंटू उर्फ महादेव गायकवाड याचे सुनीता मधुकर पोरखे हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरून सुनीता आणि तिचा भाचा अंबादास बिरादार हे पिंटूला वारंवार जीवे मारण्याची धमकी देत असत. ६ सप्टेंबर रोजी सकाळी नेत्रगाव शिवारात पिंटूचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.
सत्र न्यायालयाने फेटाळला होता जामीन
पोलीस तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपी अंबादासने उदगीर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
उच्च न्यायालयातील युक्तिवाद
सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपीने ॲडव्होकेट अजिंक्य रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणी दरम्यान ॲड. रेड्डी यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले:
ऐकीव साक्षीदार: दोषारोपपत्रातील साक्षीदार आणि घरमालक यांचे जबाब केवळ ‘ऐकीव’ माहितीवर आधारित आहेत.
प्रत्यक्ष पुराव्याचा अभाव: घटनेच्या वेळी किंवा त्यानंतर आरोपी मयत व्यक्तीच्या संपर्कात होता, याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही.
जप्तीचा अभाव: आरोपीकडून गुन्ह्याशी संबंधित कोणतीही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आलेली नाही.
सहभागाचा पुरावा नाही: गुन्ह्यात आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याचे दर्शवणारा एकही ठोस पुरावा पोलीस रेकॉर्डवर नाही.
न्यायालयाचा निर्णय
बचाव पक्षाचा हा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी आरोपी अंबादास प्रकाश बिरादार याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. युसूफ शेख आणि ॲड. विष्णू कंदे यांनी कायदेशीर सहकार्य केले.
