ग्रामसेवकाला पाच हजाराचा दंड
राज्य माहिती आयुक्तांचा निर्णय
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे माहितीदाराने मागवलेली माहिती वेळेवर न पुरवल्याने औरंगाबाद येथील राज्य माहिती आयुक्तांनी ग्रामसेवकास तब्बल 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी येथील रहिवासी असलेले सुधीर सगर यांनी माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडे काही विषयावर माहिती मागवली होती. परंतु त्यांनी वेळेत माहिती दिली नाही. 30 दिवसानंतर सगर यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. पुन्हा त्यांनी राज्य माहिती आयोग औरंगाबाद यांच्याकडे धाव घेतली असता प्रस्तुत प्रकरणात अपिलार्थी यांच्या अर्जा संदर्भात वस्तुस्थिती उपलब्ध करून न दिल्याचा ठपका ठेवत जन माहिती अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडून पाच हजार रुपये जमा करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना दिले आहे.