गडकरीजी कुठे आहेत आदर्श काम?तोंडाला डांबर फासून कमवत सुटलेत दाम!!
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गाची कामे अत्यंत दर्जेदार चालू असून मराठवाड्यातील आमदार कंत्राटदाराला दाब देऊन हस्तक्षेप करत असल्याचा घणाघाती आरोप करणाऱ्या ना. नितीन गडकरी यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्याच खात्यातील अधिकारी त्यांच्या आदर्शवादी प्रतिमेला डांबर फासून खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत! आता हा भ्रष्टाचार त्यांना दिसत नाही की, याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ! हा चौकशीचा विषय आहे. कारण या राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले काही अधिकारी मनमानी कारभार करत सुटले आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाचे व समाजाचे पैसे लुबाडत आहेत. यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांनी, माहिती अधिकार अंतर्गत आर टी आय चे कार्यकर्ते यांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना या सामाजिक कामापेक्षा भ्रष्ट अधिकाऱ्याचे गुणगान करण्यात धन्यता वाटते ! रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर अर्थात बार्शी- ढोकी- मुरुड- लातूर या रस्त्याच्या लांबीत प्रत्यक्ष न झालेल्या कामाचे चार कोटी 35 लाख शासकीय देयकाची रक्कम हडप केल्याचा आरोप तक्रारदारांनी 9 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्रालय ना. नितीन गडकरी यांच्याकडे केला आहे. यासंदर्भात तक्रारदार यांनी गौरीशंकर प्रभुलिंग स्वामी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्यावर शासकीय रकमेचा अपहरण केल्याबद्दल गुन्हा नोंद करून तात्काळ निलंबित करावी. अशी मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदार यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर की मी क्रमांक 22 /00 ते 41/000 येडशी ते ढोकी या लांबीत मजबुतीकरणाचे काम जॉब क्रमांक एन एच 63 एमए एच 2019 -20 -53 रुपये 11.16 कोटी अन्वय मंजूर होते. सदरील कामाची निविदा स्वीकृती दि. 28 फेब्रुवारी 2020 होती. तसेच कामास कार्यारंभ आदेश दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी देण्यात आला होता. काम करण्याचा कालावधी सहा महिने म्हणजेच 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत होता. सदरील काम मे. सुभाष देशमुख अँड कंपनी सोलापूर या ठेकेदारास देण्यात आले होते. निविदा शर्तीनुसार सदरील काम दि. 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु सदरील काम गौरीशंकर प्रभुलिंग स्वामी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूर यांनी त्यांचे मे.इंडोटेक कन्स्ट्रक्शन कंपनी लातूर यांना करावयाचे असल्याने मूळ ठेकेदारास काम करू न देता स्वतःचे कंपनीमार्फत अर्धवट स्थितीत काम केलेले आहे. सदर रस्त्याचे कोणतेही काम प्रत्यक्षात न करता श्री स्वामी यांनी आगाऊ रक्कम म्हणून प्रथम देयक 7.00 किमी डीबीएम व 03.50 किमी बीसी असे रुपये 02.39 कोटी ठेकेदाराच्या नावावर अदा केलेले आहेत. नंतर द्वितीय देयक प्रत्यक्षात कोणतेही काम न करता आगाऊ रक्कम म्हणून रुपये 02.42 कोटी दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी मोजमाप पुस्तिका क्रमांक 112/ 91751 ते 91800 (मोठा आकर) पान क्रमांक 754 ते 756 मध्ये नोंदी करून ठेकेदाराच्या नावावर आदा केलेले आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम न केलेल्या प्रथम व द्वितीय आगाऊ देयकाची एकूण रक्कम 4.81 कोटी रकमेतून श्री स्वामी आणि स्वतःच्या इंडोटेक कंपनीच्या नावे नोव्हेंबर 2020 मध्ये 60/ 80 ड्रम मिक्स डांबर प्लांट, सेंसर पेव्हर, दोन व्हाॅयब्रेटरी रोलर, सहा टिप्पर, डांबर साठी ब्राउजर इत्यादी मशिनरी खरेदी केल्या आहेत. बेकायदेशीर पणे डांबर प्लांट मुरूड बायपास येथे उभारला आहे.
डांबर प्लांट ची कहाणी तर फार मजेशीर आहे. हा प्लांट उभा राहिल्यानंतर अनुरथ तात्याराव चांदमारे यांनी अशा पद्धतीचा प्लांट उभा करत असताना घ्यावयाच्या नाहरकतिच्या अनुषंगाने विविध खात्याशी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 1 फेब्रुवारी 2021 रोजी स्पष्टपणे असे नमूद केले आहे की, शिवशंकर प्रभुलिंग स्वामी यांना डांबर प्लांट टाकण्यासाठी कार्यालयातील उपलब्ध नस्ती तपासली असता असे निदर्शनास आले आहे की कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही.
अशाच पद्धतीचे पत्र सहाय्यक नगररचनाकार लातूर यांनीही दिले असून मौजे मुरुड येथे उभा राहिलेल्या या प्लॉटची जागा जमीन गट नंबर 653 मध्ये गौरीशंकर प्रभुलिंग स्वामी व शिवशंकर प्रभुलिंग स्वामी यांचे नावे लेआऊट मंजूर झालेली नोंद दिसून येत नाही. अशा पद्धतीचे पत्र 25 जानेवारी 2021 रोजी चांदमारे यांना दिले आहे.
यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय लातूर खनिकर्म विभाग (गौण खनिज) या विभागानेही चांदमारे यांना स्पष्टपणे कळवले आहे की, लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील छत्रपती शाहू इंग्लिश स्कूलच्या जवळ शिवशंकर प्रभुलिंग स्वामी यांना डांबराचा परवाना दिलेला नाही.
सदरील प्रकरणी लातूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी टेंभुर्णी- ढोकी -मुरुड -लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर चालू असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर सुरू असलेल्या डांबराचा हॉट मिक्स प्लांट योग्य आहे की नाही? या अनुषंगाने सहा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी लातूर यांच्या कार्यालयाच्या वतीने 8 फेब्रुवारी 2021 रोजी चांदमारे यांना पत्र देऊन मौजे मुरुड येथील अनाधिकृत डांबर प्लॉटच्या वर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सुनावणी ठेवण्यात आल्याचे कळवले आहे. यासोबतच उपविभागीय अधिकारी लातूर यांच्या कार्यालयाच्या वतीने तक्रारदार यांना स्पष्ट केले आहे की, मौजे मुरुड येथील गट क्रमांक 653 मध्ये श्री शिवशंकर प्रभुलिंग स्वामी व गौरीशंकर प्रभुलिंग स्वामी यांना अकृषी परवानगी दिली असल्याचे दिसून येत नाही. असे दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी कळवले आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रानेही तक्रारदार यांना 1 फेब्रुवारी 2021 रोजी स्पष्ट केले आहे की, शिवशंकर प्रभुलिंग स्वामी यांनी डांबर प्लांटसाठी या कार्यालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर नमूद केलेल्या नावाने उद्योग घटकांची नोंदणी केल्याचे दिसून येत नाही.
या प्लांट मुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे, तसेच बाजूला असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे! त्यामुळे सदरील प्लांट तात्काळ बंद करून संबंधितावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, तसेच बोगस उचललेले बिले वसूल करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अशीही मागणी तक्रारदार यांनी केली आहे. कोणत्याही विभागाची परवानगी न घेता मनमानी करत डांबर प्लांटची उभारणी करणे कितपत योग्य आहे?
इतकेच नाही तर संबंधित स्वामी यांनी प्रत्यक्ष न केलेल्या कामाचे तृतीय देयक म्हणून 2 कोटी 3000 हजार रुपये ठेकेदाराच्या नावावर पदाचा दुरुपयोग करून दि. 3 जानेवारी 2021 रोजी चे मोजमाप पुस्तिका क्रमांक 110, 91651 ते 91700 मोठा आकार पान क्रमांक 663 प्रमाणे अदा केले आहे. प्रथम द्वितीय व तृतीय असे मिळून एकूण 6 कोटी 85 लाख रुपये ठेकेदाराला अदा केलेले आहेत तृतीय देयका द्वारे अदा केलेल्या मोजमाप पुस्तिका वरील नोंदीनुसार 19 किलोमीटर डी बी एम व 14.50 किमी बी.सी देयक दिलेले आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील आज रोजी फक्त 16 किमी डी बी एम चे काम झालेले आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर प्रत्यक्ष झालेल्या कामानुसार देयकाची रक्कम रुपये 02:50 कोटी होते परंतु श्री स्वामी यांनी पदाचा दुरुपयोग करून एकूण रुपये 6.85 कोटी एवढे देयक ठेकेदाराच्या नावावर आदा करून एकूण आगाऊ रक्कम उचलली आहे. शासकीय रक्कम हडप करून आर्थिक घोटाळा केलेला आहे. कुंपणच शेत खाते म्हटल्याप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काळजीपूर्वक महामार्गाचे काम पाहायला पाहिजे होते ते जर या आदर्शवादी कल्पनेला काळीमा फासून मनमानी कारभार करत असतील तर अशा पांढरपेशी प्रवर्गातील गुन्हेगारांना वेळीच वेसन नाही घातल्यास काळ सुखावणारा आहे म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण हा काळ जर स्वस्त सोकावला तर गडकरी साहेब तुमच्या आदर्शवादाला कवडीची किंमत राहणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहेत.
हा कार्यकारी अभियंता स्वतःला नितीन गडकरींचा अत्यंत निकटवर्ती असल्याची बतावणी करून इतर अधिकाऱ्यांना वेठीस धरून इतरत्र बदली झाल्यास तात्काळ दुसऱ्या विभागातून पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरच बदली करून घेतो याचे गुपित काय हा एक न समजलेला प्रश्न आहे. या अधिकाऱ्याला खरेच गडकरी साहेबांचे आशीर्वाद आहेत का की त्यांच्या निकटवर्तीयांच्या भागीदारीमध्ये याचा नंगानाच चालू आहे असाही प्रश्न आता जनता विचारू लागली आहे. गडकरी साहेब वेळीच शहाणे व्हा अन्यथा ही तुमची पिलावळ तुमच्या प्रतिमेला डांबर फासून मनमानी करून पैसा कमवून स्वताला धन्यता मानेल बाकी आपण सुज्ञ आहात योग्य तो निर्णय घ्यावा ही जनसामान्यांची अपेक्षा आहे.
हा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग वरील गौरीशंकर प्रभुलिंग स्वामी याची जर इतर विभागात बदली झाल्यानंतर 2-4 महिन्यातच ती बदली रद्द करून दुसरीकडे बदली करून घेणे आणि अधिकाऱ्यावर दबाव टाकून मनमानी करणे, तसेच गुत्तेदार पोसणे अशा स्वरूपाचे काम करणाऱ्या स्वामींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी. अशीही मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व राज्यमार्ग विभागाचे कर्तबगार मंत्री नितीन गडकरी यांना गडकरी नाहीतर रोडकरी म्हणूनही ओळखले जात होते. मात्र आता एकेक प्रकरण उघड झाल्यानंतर शितावरून भाताची परीक्षा म्हणतात, त्या पद्धतीने एकूण हा विभाग तर भ्रष्टाचाराने बरबटलेला नाही ना? असाही प्रश्न नागरिक करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना देखील संबंधित खात्याच्या वतीने कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा ही प्रश्न तक्रारदाराने केला आहे !