जालना ते तिरुपती विशेष रेल्वे आजपासून
उदगीर (एल.पी.उगीले) : जालना ते तिरुपती आणि तिरुपती ते जालना साप्ताहिक विशेष रेल्वे आज पासुन सुरु होत आहे याचा भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
साप्ताहिक जालना ते तिरुपती विशेष रेल्वे उदगीर, गुलबर्गा मार्गे तिरुपती पहोचणार आहे. आज रविवार दि. ३० ऑक्टोंबर, ६, १३, २०, २७ नोव्हेंबर व ४ डिसेंबर अशा सहा फेऱ्या मंजूर झाल्याचे रेल्वे प्रशासन जनसंपर्क अधिकारी यांनी काढलेल्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. जालना – तिरुपती गाडी क्र ०७४१४ दुपारी ११.५० वाजता ही गाडी जालना येथून सुटेल. परभणी, परळी, लातूर रोड स्थानकावर थांबा घेत उदगीर स्थानकावर सायंकाळी ६:४५ वाजता येईल. पुढील मार्गावर भालकी, बिदर, हुमनाबाद, गुलबर्गा, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंतकल, कडप्पा, रेनिगुंटा मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ०९.०५ वाजता पोहचेल. परतीच्या मार्गावर तिरूपती- जालना ही गाडी क्रमांक ०७४१३ दिनांक १, ८, १५, २२, २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी मंगळवारी सायंकाळी ६.३५ वाजता तिरुपती स्थानकावरून सुटेल आणि आलेल्या मार्गानेच उदगीर येथे बुधवारी सकाळी ०८:४४ तर जालना स्थानकावर सायंकाळी ६:०० वाजता पोहचेल. उदगीरसह परिसरातील भाविक व प्रवाश्यानी दैनंदिन तिरुपती गाडीची मागणी केली होती. त्यास रेल्वे प्रशासनाने प्रतिसाद देत, तात्पुरत्या सहा फेऱ्या साप्ताहिक गाडी मंजूर केली आहे. या गाडीला उत्तम प्रतिसाद भेटला तर ही गाडी दैनंदिन होण्यास मदत होणार आहे. या गाडीच्या मंजुरीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होती. नांदेड, परभणी, परळी, लातूर, उदगीर, भालकी, बीदर, गुलबर्गा भागातील बालाजी भक्तासाठी योग्य वेळ असणारी गाडी आहे. याचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा. असे आवाहन क्षेत्रीय सल्लागार सदस्य दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद तथा रेल्वे संघर्ष समिती, उदगीर चे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.