श्याम कला व क्रीडा पंधरवडा उद्घाटन सोहळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये श्याम कला व क्रीडा पंधरवडा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व क्रीडागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून दरवर्षी कला व क्रीडा पंधरवड्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी कला व क्रीडा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य होते तर उद्घाटक म्हणून क्रीडा सहाय्यक अधिकारी सतिष पाटील होते. प्रमुख उपस्थिती संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये , संस्था सहसचिव अंजुमनीताई आर्य, गटसाधन केंद्र उदगीरच्या केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे, श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, श्यामलाल प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक विवेक उगिले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्याम कला व क्रीडा पंधरवडा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी असे विद्यार्थी प्रिय उपक्रम संस्था, शाळा राबवत आहेत. ही बाब अतिशय महत्वपूर्ण व उपयोगी आहे, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कला व क्रीडा उपक्रमात आनंदाने सहभाग घ्यावा, व आपल्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी खेळ,व्यायाम अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सर्वांनी नियमितपणे खेळ खेळले पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कला व क्रीडा चे महत्व विद्यार्थी जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. मैदानी खेळ नियमितपणे खेळून आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. क्रीडा पंधरवड्याचे उद्घाटक सतीश पाटील व संस्था पदाधिकारी यांनी मैदानावर प्रत्यक्ष खेळ खेळून उद्घाटन केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.