बालसाहित्य मुलांचे भावविश्व फुलवणारे हवे – माने
उदगीर (एल.पी.उगीले) : बाल साहित्य मुलांचे भावविश्व फुलविणारे असते. ते लिहिताना साहित्यिकांना मुल होऊन लिहावे लागते. असे मत उदगीर येथे बालवाङमय पुरस्कार वितरण सोहळ्यात कवी योगिराज माने यांनी व्यक्त केले.
येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय सभागृहात अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था व शिवार प्रबोधन साहित्य मंच, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाङमय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील सुप्रसिध्द साहित्यिक, कवी योगिराज माने, उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार मुंबई येथील रमेश तांबे यांच्या चिनूचे स्वप्न या बालकादंबरीस, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार नांदेड येथील वैजनाथ अनमुलवाड यांच्या रंग सारे मिसळू द्या ! या बालकविता संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार कोल्हापूर येथील नीलम माणगावे यांच्या बिलोरी कवडसे बालकथा संग्रहास प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५०५१ / – रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे होते. अध्यक्षीय समारोपात रामचंद्र तिरूके म्हणाले, पालकांनी मुलांना वेळ देऊन लेखन- वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. तरच आजची पिढी सुसंस्कारीत बनेल. प्रास्ताविक संस्थेच्या सहकार्यवाह अनिता यलमटे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यवाह रसूल पठाण यांनी केले. तर आभार अध्यक्ष प्रा. रामदास केदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष दयानंद बिरादार, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, प्रा. बिभीषण मद्देवाड, अंकुश सिंदगीकर, अंबादास केदार, प्रा. राजपाल पाटील, चंद्रदीप नादरगे यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.