उदगीरच्या मातीतून आयपीएस, आयएएस तयार व्हावेत : माजी मंत्री आ. बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : शहराची ओळख देशाच्या नकाशावर सांस्कृतिक शहर म्हणून नव्याने होत आहे. महाराष्ट्रात व देशात जसे लातूर पॅटर्नचे नाव गाजत आहे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उदगीर शहराचे नाव व्हावे. उदगीर मतदार संघाचा भौतिक विकास करण्याबरोबरच आपला बौद्धिक विकास करण्यासाठी मी सदैव अग्रेसर आहे. या शहराला शैक्षणिक शहर म्हणून भविष्यात संबोधले जावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. उदगीर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. महाराष्ट्रात व देशात आपल्या उदगीर शहराचे नाव एक शैक्षणिक शहर म्हणून करावे. याच उदगीरच्या मातीतून आयपीएस, आयएएस तयार व्हावेत. असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते शहरातील दिप करिअर अॅकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, अविनाश गायकवाड, दिलीप कांबळे, लहुकुमार कांबळे, नामदेव भोसले, अॅकॅडमीचे संचालक दिपक कांबळे , देवणीचे प्रशांत माने, हर्षवर्धन हावरगेकर, अंबादास किवडे, जीवन किवडे, भगवान मटके, सिद्धार्थ सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते निमलष्करी दलात निवड झालेले गायकवाड चंद्रकांत अशोक, कापडे सत्यम किशन, केंद्रे नवनाथ जीवन, शिंगाडे विवेक, यांचा तर पीएसआय मेन्स पात्र असलेल्या दीपा फड, स्कॉलरशिप परीक्षेत तांबोळी सारा, सूर्यवंशी स्नेहल, चिल्ले प्रसाद, मनसुरे तनुजा, पटणे वैष्णवी, मयुरी स्वामी, ईश्वरी हारनूळे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, दिप करीअर अॅकडमीच्या वतीने स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन येत्या काळात आपणास कसलीही अडचण भासली तर मी आपल्या पाठीमागे खंबीर उभा असल्याची ग्वाही दिली.
या अकॅडमीमध्ये पोलीस भरती, सरळ सेवेसाठी मार्गदर्शन केले जाते, व विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते, त्यात पीएसआय, एसटीआय, एएसओ आदीचा समावेश असुन आपण सर्वांनी तुमच्या उज्जवल भविष्यासाठी मन लावून अभ्यास करावे. असे आवाहन करुन गेल्या तीन वर्षात उदगीर शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. येत्या काळात आपल्या भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चळवळ उभी करुन विविध अभ्यास केंद्र शहरात आहेत. होतकरु विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या अभ्यास केंद्राचा व नगर परिषदेच्या वतीने लवकरच आपल्यासाठी सुसज्ज असे अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे त्या अभ्यास केंद्राचाही फायदा आपण सर्वांनी घ्यावा. आपण आपले व्हिजन ठरवुनच दिवस रात्र मेहनत करून शासनाच्या मोठ्या पदावर आपण काम करावे. अशी आशा व्यक्त केली. देशाच्या नकाशावर उदगीर शहराचे नाव हे शासकीय अधिकाऱ्यांचे शहर म्हणून व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार असून आपणही माझा विश्वास सार्थ ठरवाल. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.