हातभट्टीच्या दारूची विक्री करायचे भारी!! वाढवणा परिसरात कसे चालू देणार कर्तबगार अधिकारी?

हातभट्टीच्या दारूची विक्री करायचे भारी!! वाढवणा परिसरात कसे चालू देणार कर्तबगार अधिकारी?

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरातीलही काही भागात श्रम परिहारासाठी कष्ट करणारे गोरगरीब मजूर, कष्टकरी आपल्याला परवडेल अशा भावात मिळणारी नशा म्हणून हातभट्टीच्या दारूला प्राधान्य द्यायचे. वाडी, तांड्यावरून ग्रामीण भागात आणि शहरात देखील ट्यूब मधून किंवा दुधाच्या कॅन मधून हातभट्टीची दारू अवैध विक्रीसाठी आणली जात होती. अशा पद्धतीची चर्चा सर्रास चालू होती. याच दरम्यान आता ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या अवैध धंद्यांना पूर्णपणे प्रतिबंधित करण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमधील काही वाडी, तांड्यावर यापूर्वीही वाढवणा पोलिसांनी धाडी टाकून अवैध हातभट्टीची दारू जप्त केली होती. तसेच ही दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनही नष्ट केले होते. मात्र असे असले तरीही, कमी श्रमांमध्ये भरपूर पैसा देणाऱ्या या हातभट्टीच्या धंद्यात रमलेल्या लोकांना हा धंदा आकर्षक वाटणे स्वभाविक आहे.

त्यामुळे या भागात पुन्हा नव्याने हातभट्टीचा धंदा सुरू झाल्याची माहिती वाढवणा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजली होती.

वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी मग पोलीस नायक बोईनवाड, संजय कलकट्टे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, महिला पोलीस नायक नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल शेख, अक्केमोड यांना निर्देशित करून अचानकपणे सदरील ठिकाणी धाडी घालण्याच्या सूचना केल्या होत्या.

वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरशेळकी तांड्यावर अवैध पद्धतीने हातभट्टी दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे पहाटेच्या वेळी वाढवणा पोलीस स्टेशनचे विशेष पथक डोंगरशेळकी तांड्यावर तीन ठिकाणी वेगवेगळ्या धाडी टाकून हातभट्टीची दारू आणि सदरील दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन नष्ट करण्याच्या सूचना दिल्या. या तीन धाडीमध्ये सोळाशे लिटर दारू ज्याची प्रति लिटर साठ रुपये किंमत या प्रमाणे 96 हजार रुपयांचे रसायन जे हातभट्टी दारू बनवण्यासाठी व चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्यावरून तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करून ते रसायन नष्ट करण्यात आले.

हातभट्टीच्या दारूची विक्री करायचे भारी!! वाढवणा परिसरात कसे चालू देणार कर्तबगार अधिकारी?

पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताई चंद्रकांत राठोड (राहणार डोंगरशेळकी, तालुका उदगीर) यांच्याकडे सहाशे लिटर रसायन ज्याची किंमत 36 हजार रुपये आढळून आले. म्हणून तिच्याविरुद्ध कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार मुक्ताबाई चंद्रकांत राठोड हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आणखी एक ठिकाणी त्याच तांड्यावर अनुसया अशोक पवार ही महिला देखील हातभट्टीची दारू बनवत असल्याचे समजताच त्या ठिकाणी जाऊन तिच्याजवळ 400 लिटर रसायन ज्याची किंमत 24 हजार रुपये होते. ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नायक अक्केमोड यांच्या फिर्यादीवरून कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच फिर्यादी राज मोहम्मद शेख पोलीस हवालदार यांच्या फिर्यादीवरून रामकिशन राठोड यांच्या जवळून 600 लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. ज्याची किंमत 36000 होते, असे एकूण तिघा जवळून सोळाशे लिटर हातभट्टी तयार करण्याचे रसायन त्याची किंमत 96 हजार रुपये होते. ते जप्त करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नष्ट करण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी काही हातभट्टीची दारू जप्तही करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट तपासाबद्दल वाढवणा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तसेच किंमत कमी म्हणून तळीराम यांनी हातभट्टीच्या नवसागर मिश्रित विषारी दारू घेऊ नये. असेही प्रबोधन केले जात आहे. तसेच अशा पद्धतीने कुठे अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक केली जात असेल तर तात्काळ त्या संदर्भात पोलिसांना माहिती कळवावी. असे आवाहनही सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी केले आहे.

About The Author