शरद पवारांच्या वाढदिवशी, राष्ट्रवादीचे सणात सोयरा साजरा!!
कार्यक्रमाचा उडाला की बोजवारा !!!

शरद पवारांच्या वाढदिवशी, राष्ट्रवादीचे सणात सोयरा साजरा!!<br>कार्यक्रमाचा उडाला की बोजवारा !!!

उदगीर (एल. पी. उगिले) देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग उदगीर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यांच्यावर निष्ठा ठेवून हे नेतृत्व जपले पाहिजे, यासाठी लोक प्रयत्न करतात, जनतेकडून मिळणारे प्रेम, उदगीरचे लोकप्रतिनिधी आ. संजय बनसोडे खूप चांगल्या प्रकारे ओळखतात.
जनतेच्या त्या प्रेमाला जपण्यासाठीच नजर लागावी अशा पद्धतीने विकासाचा डोंगर रचण्याचे कार्य ते करत आहेत, त्यांचे हे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र त्यांच्या या कार्याचे श्रेय लाटण्यासाठी दुसरेच कार्यकर्ते जे स्वतःला नेते समजतात, असेच पुढे येऊन लोकांमध्ये दिशाभूल करत आहेत. स्वतःचे कोणतेही मोठे कार्य नसतानाही, आपण फार मोठे आहोत. हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय, कार्यकर्त्यांचा आणि नेते समजणाऱ्या लोकांचा हा गैरसमज झालेला आहे. त्यामुळेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला ढकलण्याचे पाप ही मंडळी करत आहेत, असे असले तरीही निष्ठावंतांची निष्ठा कधीही कमी होणार नाही. हे निश्चित! स्वतः दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापनेपासून केलेले कार्य आणि पक्ष वाढीसाठी घेतलेली मेहनत याचे काहीच देणे घेणे नसल्याने, केवळ वरिष्ठ नेत्यांच्या समोर मोठ मोठ्या गोष्टी सांगून, रूट बेसला धक्का देण्याचे आणि पक्षाचे काहीही होवो, आपले भले झाले पाहिजे. अशा स्वार्थी भावानेने काही स्वयंघोषित नेते पावसाळ्यातील छत्र्या उगवव्यात तशा प्रकारे उगवत आहेत, प्रत्येक गोष्ट दस्तूर खुद्द, विकास मूर्ती, कर्मयोगी आ. संजय बनसोडे यांनीच करावी. आणि आपण केवळ त्यांच्या पदाचा जमेल तसा गैरफायदा घ्यावा, यासाठी जणू चढाओढच लागली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणून परवा राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते,त्याकडे पाहता येऊ शकेल!
विशेष कोणता कार्यक्रम घेण्यापेक्षा राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या वतीने चालू असलेल्या अंधत्व निवारणाच्या महायज्ञात आपला फार मोठा सहभाग आहे, हे दाखवण्यासाठी नेत्ररोग शिबिर आयोजित केले होते. मात्र या शिबिरासाठी स्थानिक कार्यकर्ते जे स्वतः नेते म्हणून मिरवतात त्यांनी फारसे प्रयत्न, मेहनत घेतली नसल्यामुळे नियमित जशा पद्धतीने तपासणी होते. तशाच पद्धतीने नेत्र रुग्णांची तपासणी झाली. या गोष्टीबद्दल हलक्या आवाजात अनेकांनी कुजबुजही केली, मात्र त्याच्याकडे कोणी दखल घेतली नाही. यापूर्वी हेच कार्यकर्ते टाईप नेते यांना चार आण्याची केळी वाटून आणि बाराण्याची प्रसिद्धी करण्याची सवय लागलेली होती. मात्र अशात रुग्णालयातील रुग्ण अशा लोकांचे फळे घेणे ही टाळू लागली आहेत, तसेच एक दोन केळी देऊन फोटो काढून रुग्णांना फळे वाटप हा मोठा कार्यक्रम घेतला. अशा पद्धतीचा गवगवा करण्याचा प्रयत्नही आता साध्य होत नाही,नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. लखोटीया देव माणूस असल्याने कोणीही यावे, टिकली मारून जावे. अशा पद्धतीने उठ की सूट, नेत्र रुग्णालयाचा अंधत्व निवारनाचा यज्ञ आम्हीच चालवतो, अशा थाटात बिनधास्तपणे कार्यक्रमाचे आयोजन करून मोठमोठ्या गप्पा मारण्याचे काम अनेक जण करत आहेत.
पक्षाने दिलेले मोठेपण विसरून स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षाही छोटे कार्यक्रम घेण्याची देखील तयारी या कार्यकर्त्यांकडे शिल्लक राहिलेली नाही. कोणीही लोक विचारत नसल्याने आयत्या पिठावर रेघोट्या म्हणतात, त्याप्रमाणे फुकटचे श्रेय लाटण्यासाठी चढाओड लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशी परिस्थिती असताना देखील कर्मयोगी आ. संजय बनसोडे यांनी आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची लायकी विचारात न घेता, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सप्ताह साजरा करावा. असे आवाहन केले. जिथे एकाच कार्यक्रमाचे वांदे! तिथे सप्ताह भर कार्यक्रम घेण्याची कोणाची तयारी असणार आहे? काही असले तरी एवढ्या मोठ्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अशा पद्धतीने हसे होणे निश्चितच चुकीचे आहे!
ग्रामीण भागात म्हणतात की, “सणात सोयरा साजरा करावा, म्हणजे खर्च होत नाही” तशाच पद्धतीने राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्ते टाईप नेत्यांनी सणात सोयरा साजरा करावा. अशी भूमिका घेत लायन्स नेत्र रुग्णालयाच्याच कार्यक्रमात आपलाही कार्यक्रम घुसडला, हे तर आ. संजय बनसोडे यांचे मोठेपण की, त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नावाने होत असलेल्या इमारतीची भव्यता आणखी वाढावी, यासाठी आमदार फंडातून 25 लाख देण्याची घोषणा केली. तसे तर त्यांनी यापूर्वीही पन्नास लाख मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्या कामाची पायाभरणी देखील याप्रसंगीत संपन्न झाली.
सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे केवळ विकास मूर्ती आ. संजय बनसोडे ! असेच समीकरण झालेले आहे. इतर कार्यकर्ते कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आणि स्वतः मिरवणारे यांचे खरे मोठेपण आता जनता ओळखू लागली आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.

About The Author