उदगीर तालुक्यातील 26 गावाचे सरपंच जाहीर
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या, यामध्ये चिमाचीवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होती, त्यानंतर उर्वरित 25 ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत शांततेमध्ये संपन्न झाली. तसेच मतमोजणी तहसील कार्यालयात शांततेच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तात संपन्न झाली. या 25 गावातील या निवडी काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या तर काही ठिकाणी एकतर्फी झाल्या.
या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष किंवा आघाडी, युती असे प्रकार फारसे दिसून आले नाहीत. अनेक राजकीय पुढार्यांनी “नवरा मेला तरी चालेल, सवत रांडव झाली पाहिजे” अशी भूमिका घेत, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे वाद लावून दिले आहेत. अशी ही चर्चा ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे. या छोट्या छोट्या निवडणुकातील हेवे दावे आणि याचे परिणाम येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेवर देखील झाले तर नवल नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उदगीर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या सरपंचांची नावे अशी, सुकनी जाधव आशा नागनाथ तर मुर्तळतळवाडी (हाळी) चे सरपंच म्हणून पाटील प्रभाकर व्यंकटराव यांची निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. चिमाचीवाडी या ठिकाणी श्रीमती दुर्गावाढ मीरा पंढरी यांची बिनविरोध निवड झाली होती. तीवटग्याळचे सरपंच म्हणून पाटील प्रशांत काशिनाथ तर हैबतपुरच्या सरपंच म्हणून श्रीमती नरहरे अनुराधा तुकाराम, शेकापूरच्या सरपंच श्रीमती शेळके उर्मिला विठ्ठल, देवर्जन येथील युवा कार्यकर्ते साकोळकर अभिजीत चंद्रप्रकाश, वायगावच्या सरपंच म्हणून श्रीमती कांबळे काशीबाई दत्तू, सातारा (बुद्रुक) येथील सरपंच म्हणून तिरकोळे कुसुंबा वाघम्बर, शंभू उमरगा येथील सरपंच म्हणून स्वामी लिंगेश्वर दिलीप, दिग्रस येथील सरपंच म्हणून ढगे चंद्रसेना ज्ञानोबा, मोघा येथील सरपंच म्हणून श्रीमती काळोजी शिलाबाई चौधरी, तोगरी येथील सरपंच म्हणून गुरुस्थळे अश्विनी नागप्पा,रावणगाव सरपंच म्हणून श्रीमती पाटील लक्ष्मीबाई हनुमंत,तोंडचीर येथील पाटील सुनिता मदनकुमार, सोमनाथपुरच्या सरपंच श्रीमती अंबिका ज्ञानेश्वर पवार, तोंडार येथील सरपंच कोचेवाड भरत मारुती, कल्लूरचे सरपंच कुंडगीर लक्ष्मण राजकुमार, उमरगा मन्ना येथील सरपंच म्हणून श्रीमती सलगरे सावित्रीबाई विजयकुमार तर मलकापूर येथील सरपंच म्हणून बिरादार गुरुनाथ देवराव, नेत्रगाव येथील सरपंच म्हणून श्रीमती पाटील हेमलता बालाजी, बनशेळकी येथील सरपंच म्हणून शेळके नरसिंग नामदेव, नावंदी येथील सरपंच म्हणून केंद्रे ब्रह्माजी माधवराव तर देऊळवाडी येथील सरपंच म्हणून केंद्रे शुभम चंद्रकांत, नागलगाव येथील सरपंच राठोड सुभाष मुन्ना, चोंडी येथील सरपंच म्हणून पाटील विठ्ठलराव माणिकराव यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
गाव पातळीवरच्या निवडणुकांमध्ये अत्यंत चुरस असल्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या गटातटांनी आघाडीचा धर्म वेशीला टांगून आपापला स्वार्थ साध्य केल्याचेही बोलले जात आहे.
या निवडणुकांमध्ये अपवाद वगळता प्रस्थापितांना मतदारांनी धक्का दिल्याची ही चर्चा चालू आहे. स्पष्टपणे सांगता येत नसले तरी दोन ग्रामपंचायत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे तर उर्वरित बहुतांश ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्या आहेत, विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात घालायला बऱ्याच अंशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कारणीभूत असल्याची चर्चा चालू आहे.
उदगीर तालुक्यातील हा निकाल भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने निश्चितच अनपेक्षित आहे. असे म्हटले तर नवल नाही. या निवडीमध्ये कंही खुशी कंही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत.