श्री एकविरा देवी संस्थानच्या कोविड केअर सेंटरला मान्यता
उपविभागीय अधिकारी कापडणीस यांनी भेट देवुन घेतला आढावा
महागाव (राम जाधव) : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या रुग्णांच्या सोयीसाठी हिवरा(संगम)येथील श्री एकविरा देवी संस्थान च्या मंगल कार्यालयात जिल्हा प्रशासनाने ७५बेडच्या कोविड केअर सेंटर ला मंजुरी दिली असुन आज उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी याठिकाणी भेट देवुन मंगल कार्यालयाच्या इमारतीची व उपलब्ध सोयीसुविधांचा पाहणी केली.
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम), आनंदनगर (आनंतवाडी), सेवानगर (कासारबेहळ) याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हिवरा नगरीमध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आठवे शक्तीपीठ असलेल्या श्री एकविरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने गावकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेवुन संस्थानच्या मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने माजी जि.प.सदस्य तथा संस्थानचे विश्वस्त साहेबराव पाटील यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला संस्थानच्या मंगल कार्यालयाच्या इमारतीमध्ये ५०ते७५बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीची दखल घेवुन जिल्हा प्रशासनाने तत्काळ याठिकाणी ७५बेडच्या कोविड केअर सेंटरची मान्यता दिली त्यानुसार आज उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांनी श्री एकविरा देवी संस्थानला भेट देवुन सर्व पाहणी करून उपलब्ध सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. हिवरा गाव कंटेन्मेंट झोन जाहीर झाले असुन गावातील सर्व व्यापारी व त्यांच्या दुकानातील कामगार, फेरी वाले,भाजीपाला, फळविक्रेते यांनी आपली कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असुन जे कोणी आपली चाचणी करणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगितले यावेळी तहसीलदार नामदेव ईसाळकर, नायब तहसिलदार डॉ.संतोष आदमुलवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण, पोहंडुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गावंडे, डॉ.सतीश नागपुरे, आरोग्य सेविका कु. स्नेहा जांभुळकर, श्री एकविरा देवी संस्थानचे अध्यक्ष अनंत कदम,कोषाध्यक्ष माजी.जि.प.सदस्य साहेबराव पाटील,उपाध्यक्ष डॉ.धोंडिराव बोरूळकर, देविदास भ.कदम, जि.प.सदस्य विलास भुसारे,सरपंचा सौ.मेघा बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, तलाठी एम .एम. शेख, पोलीस पाटील प्रवीण कदम, विजयराव बोंपीलवार पंजाब पाटील खंडेराव कदम, अभय बोंपीलवार, सुनील चव्हाण, मुकुंद जामकर, विनोद खोंडे, सुभाष मोरे, शामराव काळे, बिहारी जयस्वाल, यांच्यासह सर्व आशा सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.
चौकट
सामाजिक कार्यात एकविरा देवी संस्थानचा नेहमीच पुढाकार
देशावर आलेल्या.भुकंप, पुर, कोरोना यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नेहमीच पंतप्रधान मदत निधी,मुख्यमंत्री निधी मध्ये भरीव आर्थिक मदत तसेच मागील लॉकडाऊनच्या वेळी उपासमार होत असलेल्या व शासनाने सुचविलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुच्या किट पुरविणे तसेच मोठमोठ्या शहरातुन पायी गावाकडे निघालेल्या मजुरांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करणे,रक्तदान शिबिर घेणे यांसारख्या सामाजिक कार्यात श्री एकविरा देवी संस्थानचा वाटा नेहमीच मोलाचं ठरलेला असुन शासनाने श्री एकविरा देवी संस्थानच्या सामाजिक कार्याची दखल घेण्याची गरज आहे.
चौकट
कोरोना आपत्तीमध्ये वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना कोठे ठेवायचे हा प्रश्न कायम प्रशासना समोर असतो अशातच श्री एकविरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्वतःहुन पुढाकार घेवुन आपल्या मंगल कार्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्याची विनंती केली त्यांचे हे सामाजिक दायित्व जपण्याचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे व अभिनंदनीय आहे. श्री एकविरा देवी संस्थानचा आदर्श समोर ठेवुन जिल्ह्यातील सामाजिक ,धार्मिक संस्था यांनी समोर येवुन प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे : स्वप्निल कापडणीस (उपविभागीय अधिकारी उमरखेड)