खुनाच्या गुन्ह्यातील फरार होत असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केले चतुर्भुज

खुनाच्या गुन्ह्यातील फरार होत असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केले चतुर्भुज

उदगीर (एल.पी.उगीले) : अंबाजोगाई तालुक्यातील चिंचखंडी येथील बावीस वर्षे वयाच्या तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडल्याने, अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. अर्जुन पंढरी गडदे (वय 22 वर्ष रा. हाडंग वस्ती चिंचखंडी तालुका अंबाजोगाई) हा बावीस वर्षेचा तरुण पिकप चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. त्याचे आई-वडील राजनी कारखाना येथे ऊसतोड कामगार आहेत. तसेच त्याचा भाऊ पुणे येथील एका कंपनीत आहे.

सध्या अर्जुन हा गावात एकटाच राहत होता. तो शुक्रवारी रात्रीपासून घरी आला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या आईवडिलांना कल्पना दिली. तेव्हा ते कारखान्याहून गावी येऊन अर्जुनचा शनिवारपासून शोध घेऊ लागले होते. दरम्यान चिंचखंडी, ता. अंबाजोगाई, शेगडी शिवारात रस्त्यावर डोक्यात दगडाने मारल्याच्या व गळ्यावर जखमा असलेला त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, केंद्रे, पोलीस बिक्कड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवून देण्यात आला. शव विच्छेदनात गळा आवळून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केल्याची घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले.

खुनाच्या गुन्ह्यातील फरार होत असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केले चतुर्भुज

तेव्हा पोलीस प्रशासनाने या खुनाच्या अनुषंगाने, हा खून कोणी केला? कशासाठी केला? त्याचे कोणाशी भांडण झाले होते का? किंवा आणखी कोणत्या कारणाने खून झाला? यासंदर्भात पोलीस अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांना एकीव माहितीच्या आधारे सदरील खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. त्या आधारावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस तपास करत असताना, त्यांना हवा असलेला संशयीत आरोपी गोविंद बाजीराव माने वय वर्ष 20 राहणार चिंचखंडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड हा फरार झाल्याचे अंबाजोगाई पोलिसांच्या लक्षात आले.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु. र. न. 290/22 कलम302 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद केला होता, संशयीत आरोपी म्हणून गोविंद बाजीराव माने हा असून तो हैदराबाद कडे जाणाऱ्या रेल्वेने पळून जात असल्याची माहिती समजताच अंबाजोगाई पोलिसांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. तेव्हा तातडीने पोलीस उपनिरीक्षक चेरले यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, राहुल नागरगोजे, राहुल गायकवाड, सिद्धेश्वर स्वामी आणि सचिन नाडागुडे यांना सोबत घेऊन रेल्वे स्टेशन कडे धाव घेतली.

एव्हाना अंबाजोगाई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांनी भ्रमणध्वनी द्वारे संशयित आरोपीचे लोकेशन आणि आरोपीचे फोटो तसेच तो ज्या रेल्वेने जात आहे, त्या संदर्भातली माहिती कळवली. तेव्हा उदगीर ग्रामीण पोलिसांची टीमने लगेच रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे स्टेशन येथे गेल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाचीही मदत घेऊन, उपलब्ध फोटोच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना हवा असलेला संशयित आरोपी आढळून आला. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने गोविंद दाजीराव माने रा. चिंचखंडी ता. अंबाजोगाई असे सांगितले. तेव्हा या पथकांनी त्या आरोपीस ताब्यात घेऊन उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्याकडे त्याला सुपूर्द केले. या संदर्भातील माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांना कळवली. व संशयित आरोपी ताब्यात घेण्याच्या संदर्भाने सूचित केले. काही वेळानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी उदगीर येथे येऊन उदगीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. अंबाजोगाई येथील खुनाच्या प्रकरणातील संशयित आरोपीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवून ताब्यात घेऊन अंबाजोगाई पोलिसांच्या हवाली केले. याबद्दल ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!