अखिल भारतीय साने गुरुजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा अहमदपुरात उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस आणि मानव फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय साने गुरुजी कथाकथन स्पर्धा संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या. यात पाचवी ते सातवीच्या बालगटात जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मान यशवंत विद्यालयाची कुमारी अक्षता उत्तमराव कांबळे यांनी सर्व द्वितीय सुहास संकेत पलमटे यांनी सर्व तृतीय श्रेया राजकुमार तत्तापूरे यांनी तर आठवी ते दहावी च्या किशोर गटात सर्वप्रथम यशवंत विद्यालयाची कुमारी अपूर्वा दत्ता वाघमारे हिने सर्व द्वितीय बाभळगाव च्या दयानंद विद्यालयाची महादेवी अंकुश खांडेकर हिने तर सर्व तृतीय सोहम मोहनराव देशमुख यांनी पटकाविला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गणेश शिक्षण संस्थेचे समन्वयक श्री कुलदीप हाके पाटील प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर अहमदपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रभाकरराव अंधोरीकर, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, योगशिक्षक शिवमूर्ती भातांब्रे,गट साधन केंद्राच्या साधनव्यक्ती कामाक्षी पवार, मुख्याध्यापिका आशा रोडगे,लिनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कुलदीप हाके ,पीएसआय प्रभाकर अंधोरीकर यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथा मालेचे जिल्हा समन्वयक राम तत्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी तर आभार मीना तोवर यांनी मानले. यावेळी विजेत्यांना शाल, पुष्पहार,श्यामची आई हा ग्रंथ व स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कथामालेसाठी निरीक्षक म्हणून योग शिक्षिका कलावती भातांब्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उदय कुमार जोशी यांनी केले. कार्यक्रमाचा शुभारंभ साने गुरुजींच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. तर समारोप साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने करण्यात आला. या कथाकथन स्पर्धेत बालगटातून 32 विद्यार्थ्यांचा तर किशोर गटातून 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विजयी स्पर्धकांच्या मराठवाडा विभागीय पातळीवरील स्पर्धा दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सेलू येथे घेण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेच्या अध्यक्षा तथा संयोजिका श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर यांनी दिली.
