युवकांच्या मनात राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यासाठी शिबिरे महत्त्वाची- माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

युवकांच्या मनात राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यासाठी शिबिरे महत्त्वाची- माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : युवक हा कोणत्याही राष्ट्राचा आधारस्तंभ असून, युवकांच्या मनामध्ये योग्य त्या वयात समता, स्वातंत्र्य, मानवता आणि सामाजिक न्याय अशी राष्ट्रीय मूल्ये रुजवली पाहिजेत.अशा प्रकारची राष्ट्रीय आणि नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी शिबिरांची आवश्यकता असते, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे रूई दक्षिण येथे आयोजित केलेल्या सात दिवशीय निवासी शिबिरात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नामदेवराव चामले हे होते. विचारपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, सरपंच अशोकराव पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शामराव मुकनर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड, धनाजीराव देवकते, अतुल पाटील , गणेश पांचाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रुई दक्षिण सारख्या निसर्गरम्य परिसरात हे शिबिर घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर घातली आहे. या गावाचा कायापालट हे विद्यार्थी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील अनेक गावे दत्तक घेऊन महात्मा फुले महाविद्यालयाने विकसित केली आहेत. आपल्या परिसराचा विकास करणे, शिबिरांसारख्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांतून आपल्या परिसराच्या विकासात हातभार लावणे हे महाविद्यालयाचे आद्य कर्तव्य असून, यापुढेही ग्रामीण भागाच्या विकासात आपले महाविद्यालय योगदान देत राहील असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ मारोती कसाब यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रो.डॉ.अनिल मुंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सह कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी गायत्री पदमपल्ले, अंबिका चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!