मुख्यालयी कर्मचाऱ्यांची वानवा;वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
शासकीय निवासस्थाने ओस; वरिष्ठही नियम पाळत नसल्याने कारवाई शून्य
महागांव (राम जाधव) : सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे अपडाऊन हा जनतेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिणामी समस्या कमी न होता वाढत चालल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना तर निवासस्थाने असतांनाही त्याचा वापर हा शून्य असल्याने करोडो रुपयांच्या या इमारतींना वापराअभावी भंगारवस्था प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे वरीष्ठच नियम पाळत नसल्याने कनिष्ठावर कारवाई करणारच कशी ? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत सर्व शासकीय विभागाचे जवळपास वरिष्ठांपासून तर कनिष्ठापर्यंतचे सर्व अधिकारी कर्मचारी हे शहरी भागातून येऊन त्या त्या विभागाचा कारभार बघत आहेत. अनेक विभागांना कर्मचारी निवासस्थाने नसतीलही परंतु ज्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध केलेली आहेत, त्याचा खरोखर वापर होत आहे का? हा संशोधनाचा विषय असून बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी सोडले तर इतर कर्मचारी हे शहरी भागातून ये-जा करीत आहेत. काही महत्वपूर्ण विभागाचे कर्मचारी हे मुख्यालयी राहणे गरजेचे असताना दांडिमार प्रकारामुळे व वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत असून, त्याचा सर्वाधिक फटका जनतेला बसत आहे. आज रोजी आरोग्य, वनविभाग, विजवितरण, शिक्षण व स्थानिक प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे काळाची गरज असतांनाही या महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. अगोदरच अनेक विभागात कर्मचाऱ्यांनी कमतरता असल्याने जनतेची वेळेवरची कामे होत नाही. त्यातच वेळेवर कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. आज ग्रामीण भागात कोणीच राहायला तयार नसल्याने शासकीय सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. वरीष्ठच मुख्यालयी राहत नसल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांनाही फावले असून जवळपास कर्मचारी वेळ मिळेल तेंव्हा आपल्या कार्यालयात दाखल होतअसल्याने जनतेची कामे रेंगाळत आहे. यासाठी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.