उदगीर तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या! शिरोळ ( जा. ) येथून; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास !
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यात आणि शहरात पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. यामुळेच चोरट्यांनी सर्वत्र हैदोस घालून गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तालुक्यातील शिरोळ ( जानापुर ) येथील फिर्यादी आपल्या कुटुंबीया समवेत घरी झोपलेले असताना, अज्ञात चोरट्याने घराच्या गेटचा कडी कोंडा व घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ९२ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , शिरोळ ( जानापुर ) येथील नागेश मारोती भंडे उर्फ मादलापूरकर हे रात्री त्यांच्या कुटुंबिया समवेत व आई वडीलांसह जेवण खावण करून सर्वजण त्यांचे राहते घरीचे झोपलेले होते. सर्व कुटुंबीय झोपेत असताना, रात्री साडेदहा ते पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहते घराचे गेटचे कडी कोंडा व घराचे कुलूप कडी कोंडा कशाने तरी काढून घराचे आत प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले रोख रक्कम ५० हजार रुपये , एक तोळा सोन्याची बोरमाळ , १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस , एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी आणि चांदीचे १५ तोळयाचे कडे असा एकूण एक लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. नागेश मारोती भंडे उर्फ मादलापूरकर यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. र. नं. ३४ / २३ कलम ४५७ , ३८० भादंवी अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.