अंधश्रद्धांचे निर्मूलन झाल्याशिवाय राष्ट्र समृद्ध होणार नाही – माधव बावगे

अंधश्रद्धांचे निर्मूलन झाल्याशिवाय राष्ट्र समृद्ध होणार नाही - माधव बावगे

उदगीर (एल.पी.उगीले) : अंधश्रद्धा निर्मूलन हा संवेदनशील व महत्त्वपूर्ण विषय आहे. एकविसाव्या शतकातील ज्ञान, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात, हा अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणा विषय आहे.लोक शिक्षित झाले पण सुशिक्षित झाले नाहीत. आपण तंत्रज्ञानाचा वापर केला, पण वैज्ञानिक झालेलो नाहीत. उच्चशिक्षित लोक अंधश्रद्धाळू होतात, तेव्हा त्यांच्या शिक्षणाची कीव येते. समाज खऱ्या अर्थाने साक्षर होण्याची गरज आहे.कारण अंधश्रद्धांचे निर्मूलन झाल्याशिवाय राष्ट्र समृद्ध होणार नाही. असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केले.

ते शिवाजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिरात स्वयंसेवक व गावकऱ्यांसमोर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामणी येथील सरपंच सौ. प्रभावती बिराजदार होत्या, तर प्रमुख उपस्थिती निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजकुमार बिराजदार, बालाजी पाटील, हनुमंत बसपुरे, विजयकुमार साखरे यांची होती.

पुढे बोलताना माधव बावगे यांनी प्रात्यक्षिकातून भोंदूबाबाची पोलखोल केली.अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन विषयक वेगवेगळे प्रयोग करून दाखवले. आमचा श्रद्धेला विरोध नाही, पण अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे.तसेच लोक अंधश्रद्धेला बळी पडू नयेत, असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ एस व्ही शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रमाधिकारी डॉ एस व्ही शिंदे, प्रा ए एस टेकाळे, प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी व यांच्यासोबत शिक्षकेतर कर्मचारी गोविंद पाटील,नितीन शेंडगे, ग्रामस्थ सुनील पाटील, शिवदास गंगापुरे, स्वामी व स्वयंसेवकांनी केले .कार्यक्रमाला गावातील नागरिक व स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author