साहित्यिक सखी समूहाचे कार्य इतिहास घडवणारे – राजशेखर सोलापूरे
एकाच सोहळ्यात 23 पुस्तकांचे प्रकाशन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील साहित्यिक सखी समूहाच्या प्रकाशन सोहळ्यात एकूण 23 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यातली 20 पुस्तके वैयक्तिक होती तर तीन पुस्तके संपादित होती.साहित्यिक सखी समूहाच्या व्यासपीठावरून बोलताना राजशेखर सोलापुरे म्हणाले की, साहित्यिक सखी समूहाने एकाच वेळी 23 पुस्तकांचे प्रकाशन करून इतिहास रचला आहे. अनेक महिलांनी एकत्र येऊन इतके कौतुकास्पद कार्य करणे ही गोष्ट समाजाने दखल घेण्यासारखी आहे. साहित्यिक सखी समूह हा उदगीरचा साहित्यिक समूह असून यामध्ये 300 पेक्षा जास्त लेखिका आहेत. त्या महाराष्ट्रातील, महाराष्ट्रा बाहेरील व काही लेखिका अमेरिकेतील आहेत. या समूहावर सातत्याने साहित्यिक चळवळ जोमाने चालवली जाते. या समूहाच्या संचालिका सौ.अश्विनी निवर्गी, सौ.अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार,प्रा.सौ. अश्विनी देशमुख आणि उषाताई तोंडचिरकर आहेत.
वीस बाल साहित्याची पुस्तके, कथा, पल्लव हा कथासंग्रह , पारिजात व सोनचाफा हे दोन संपादित चारोळी संग्रह, अशा एकूण तेवीस पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश अंबरखाने हे होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले, साहित्यिक सखी समूह उदगीर मध्ये महिलांची खूप मोठी साहित्यिक चळवळ चालवत आहे. या समूहाकडून सातत्याने विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात, व अनेक मान्यवर या व्यासपीठावर येत आहेत. चार भिंतीत राहणाऱ्या महिलांना व्यक्त होण्यासाठी फार मोठे व्यासपीठ साहित्यिक सखी समूहाने उपलब्ध करून दिले आहे. आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने हे साहित्य पूर्ण जगामध्ये वाचले जात आहे. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे होते रामेश्वर निटुरे व विजया पब्लिकेशन्सचे प्रकाशक भूषण क्षीरसागर हे होते. भूषण क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रकाशकांनी लेखकांना पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. त्यांची दिशाभूल होऊ नये.
विजया पब्लिकेशन्स कमीत कमी खर्चात, कमी वेळेत, दर्जेदार पुस्तके तयार करण्याचा प्रयत्न करेल.विजया पब्लिकेशन्सचे औपचारिक उद्घाटन याच कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी प्रकाशक भूषण क्षीरसागर आणि सौ.अश्विनी निवर्गी यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर शाम कुलकर्णी व अनंत कदम यांचेही सत्कार याच कार्यक्रमात करण्यात आले. सरस्वती वंदना श्याम कुलकर्णी यांनी सादर केली तर प्रार्थना उषाताई तोंडचिरकर यांनी गायली.
सौ. अश्विनी निवर्गी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, समाजात बदल घडवून आणणे फार महत्त्वाचे आहे. या बदलाची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन परभणीच्या सौ.अर्चना संबरकर यांनी केले. या कार्यक्रमाला उदगीर येथील साहित्यिक सखी समूहाच्या अनेक लेखिका उपस्थित होत्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सौ.अनिता संकाये टेंकाळे, उदगीर, सौ. सुनिता कुलकर्णी लातूर, सौ.अपर्णा कुलकर्णी ,अंबाजोगाई , डॉ.अलका तडकलकर, अंबाजोगाई, प्रा.डाॅ. सीमा पांडे, नागपूर, सौ. सुहासिनी सुरशेटवार, सौ.ज्योती डोळे,सौ.मंजुषा कोंडेकर, सौ. अनिता शानेवार, उदगीर, सौ. राचम्मा मळभागे, उदगीर, सौ.अनुराधा धोंड, उदगीर, मंजुषा कुलकर्णी, उदगीर, उषा मुरूमकर पुणे, सौ. मधुमती किणीकर, उदगीर, सौ.अर्चना देशमुख, नांदेड, सौ.प्रिया देशपांडे, परभणी,सौ.हेमलता घुटे, मुरूड, सौ.दीपा कुलकर्णी, रामदास केदार, अंबादास केदार, लक्ष्मण बेंबडे, रविंद्र हसरगुंडे, विक्रम हलकीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.