दयानंद कला महाविद्यालयात शहीद दिन साजरा
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात दि 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त क्रांतिवीरांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या तीन क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी गायकवाड, श्री. धनंजय बेडदे, श्री. धनंजय भालेराव, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, रमेश देशमुख व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
शहीद भगतसिंग यांच्यावर विचार मांडत असताना प्रा.विलास कोमटवाड यांनी असे प्रतिपादित केले की 23 मार्च 1931 रोजी शहीद भगतसिंग, शहीद शिवराम हरी राजगुरू, शहीद सुखदेव थापर या तीन क्रांतिवीरांना पंजाबच्या लाहोर जेलमध्ये ब्रिटिश अधिकारी सँडर्स याच्या खुनाच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नाही म्हणून लाला लाजपतराय यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मध्ये विरोध करण्यात आला. त्या कारणाने स्कॉट या अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला करण्याचा आदेश दिला आणि त्यामध्ये लाला लजपतराय हे गंभीर जखमी झाले आणि काही दिवसातच त्यांचा यामध्ये निधन झाले. याचा प्रतिशोध म्हणून शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांनी सँडर्सची हत्या केली. तसेच बहि-र्या ब्रिटिश सरकारला भारतीयांचे गाऱ्हाने ऐकू यावे म्हणून संसदेत बॉम्ब स्फोट घडवून आणला होता. तसेच हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारकांना मार्गदर्शन, सहकार्य व मदत पुरवल्याचा आरोप आणि ब्रिटिश विरोधी कारवाया केल्याचा दावा करून भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. एकंदरीत काय तर या राष्ट्रपुरुषांचे कार्य आणि त्यांची वाढती लोकप्रियता पाहून ब्रिटिश सरकारने 24 मार्च 1931 फाशीची तारीख असताना 23 मार्च रोजी त्यांना फाशी दिली. असे प्रतिपादन प्रा.विलास कोमटवाड यांनी केले.