शिक्षणाची गंगा खेड्यापर्यंत पोहोचवणारे कर्मयोगी- डी.बी.लोहारे गुरुजी
शिक्षणाशिवाय मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास घडू शकत नाही आणि शिक्षण हे केवळ शहरी भागातील मर्यादित न राहता ते खेड्यापर्यंत पोहोचले पाहिजे ही जाणीव स्वतः अनेक अडचणी असून सुद्धा पाहुण्या रावळ्यांच्या सहकार्याने शिक्षण घेत असताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून ते गावापर्यंत पोहोचले पाहिजे हा चंग मनाशी बांधलेल्या डी.बी. लोहारे गुरुजींनी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कृपा आशीर्वादाने वयाच्या 28व्या वर्षी आपल्या जन्मगावी मुळकी उमरगा येथे 1962 साली पहिली शाळा काढून शिक्षणाच्या पवित्र कार्याचे तोरण बांधले. अशा कर्मयोगी लोहारे गुरुजींचा आज 89 वा वाढदिवस. सुरुवातीच्या काळात गुरुजींना अनेक अडचणी आल्या, शाळेसाठी उभारलेले पत्र्याचे शेड वाऱ्याने उडून गेले परंतु लोहारे गुरुजी म्हणजे *निश्चयाचा महामेरू* संघर्ष केल्याशिवाय रत्न उजळत नाही त्याप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही या उक्तीप्रमाणे एकदा घेतलेला संकल्प कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग काढून यश मिळवत आणि ते यशस्वी होत यातूनच त्यांनी सर्व कार्य यशस्वी केले. जे कार्य हाती घेतले ते प्रामाणिकपणे कष्टाने साध्य केलेले असते ते कधीच नष्ट होत नाही म्हणूनच की काय गुरुजींच्या या शिक्षण कार्याचा विकास होत गेला इसवी सन 1965 साली थोर तपस्वी आध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कृपाशीर्वादाने व माजी आमदार कै. महालिंग आप्पा सांगवीकर, कै. शिवराज अप्पा चवंडा, कै डॉ मनोहरराव रेड्डी, कै. ऍड कृष्णाराव देशमुख यांच्या सहकार्याने टागोर शिक्षण समितीची स्थापना केली व पुढे अहमदपूर सह तालुक्यातील कुमठा, रोकडा सावरगाव, येस्तार, देवणी तालुक्यात धनेगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यात धामणगाव, चाकूर तालुक्यात कबनसांगवी, रेणापूर तालुक्यात मुरढव अशा ग्रामीण भागात शाळा व सोबतच विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी वस्तीगृह काढून शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची दारी खुली करून दिली. चांगल्या विचारांचे व चांगल्या व्यक्तीचे सानिध्य मिळाले की जीवनात स्वतःहून काहीतरी करण्याची प्रचंड ओढ, त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनात कुठलाही न्यूनगंड बाळगता न थकता कार्य करण्याची सवय सुरुवातीपासूनच गुरुजींना लागली. विद्यार्थी जीवनातच इयत्ता पाचवी सहावीला असतानाच 1947 चा मराठवाडा मुक्ती संग्राम लढा चालू होता त्यात अनेक स्वातंत्र्य सेनानींनी सहभाग घेतला होता. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंद भाई श्राफ, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत त्यांच्याच विचाराचा प्रभाव गुरुजीवर पडला होता आणि पुढे संस्था स्थापनेनंतर थोर तपस्वी त्यागी राष्ट्रसंत परमपूज्य डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे अध्यात्मिक अधिष्ठान संस्थेला लाभले याचेच फलित २००२ मध्ये टागोर शिक्षण समितीला आदर्श शिक्षण संस्था राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचाराचा प्रभाव गुरुजींच्या विचारातून व कार्यपद्धतीतून दिसून येतो. आधी केले मग सांगितले या उक्ती प्रमाणे गेली 67 वर्षापासून स्वतः खादीचा वापर करतात व सर्वांना खादीचा विचार सांगतात. संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना खादीचा गणवेश करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे लोहारे गुरुजींचीच. गांधीजींच्या खेड्याकडे वळा या संदेशाप्रमाणे ग्रामीण भागात शाळा काढून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. गांधीजींच्या नई तालीम मधील शिक्षणाच्या तत्त्वाप्रमाणे गुरुजींच्या संस्थेत नेहमी नवनवीन प्रयोग व उपक्रम घेतले जातात. शिक्षकांनी नेहमी गुणवत्तापूर्वक अध्यापन करावेत यासाठी चिंतन शिबीर, तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, सर्व कर्मचाऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी योगासने संस्कार शिबिर, सूचनापेटी, आदर्श पाठ, संस्थांतर्गत तपासणी, माता-पिता आधार योजना, मान्यवरांच्या भेटी, विपश्यना, मूल्य शिक्षणाचे धडे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम, कमवा आणि शिका असे अनेक उपक्रम संस्थेत आजही राबवतात. संस्था ही कुटुंब समजून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी गुरुजी पार पाडत असतात. प्रत्येक कर्मचारी हा माझ्या कुटुंबाचा अंश आहे असे समजून सर्वांसाठी समानतेची वागणूक देत असतात. गुरुजींनी आपल्या आयुष्यात नेहमी मानवतावादाची भूमिका बजावली आहे जगत कल्याणाची प्रार्थना करत *जयजगत्* हा भाव मनात जोपासला आहे. सामान्यातील सामान्य माणसाचं कसं भलं होईल माझ्याबरोबरच अनेकांच्या जीवनाच कसं सोनं होईल अशी सामाजिक तळमळ सतत जिवंत ठेवणारे लोहारे गुरुजी आहेत. दिन-दलित पीडितासाठी त्यांच्या अंतकरणात मोठी आपुलकीची भावना आहे आणि त्यासाठी त्यांचे कार्यही खूप मोठे आहे त्यामुळे गुरुजींना दलित मित्र या नावाने आपण ओळखतो त्यामुळे गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख शिक्षण क्षेत्रातील संत म्हणून करावा लागेल. गुरूजींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 1989 ला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, 1995 राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार, 2002 आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, 2012 शिक्षण रत्न पुरस्कार, 2015 जन्मगावी मुळकी भूषण पुरस्कार, 2018 वसंतराव काळे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रभाषा सभा पुणे, भारत स्काऊट गाईड, खादी ग्राम उद्योग मंडळ नांदेड, मराठवाडा जनता विकास परिषद, सिद्धेश्वर सहकारी बँक, रोटरी क्लब अहमदपूर अशा अनेक संस्थेचे सदस्य राहिले आहेत. गुरुजींच्या अर्धांगिनी सौ पुष्पाताई या मितभाषी असून गुरुजींना त्यांची खंबीर साथ आहे. गुरुजींच्या प्रत्येक शैक्षणिक व सामाजिक कार्याला त्यांची खंबीर साथ आहे. गुरुजींच्या प्रकृतीची काळजी घेणे त्यांचा आहार, दिनचर्या याची काळजी घेणे व शैक्षणिक कार्यात कुठलीच तक्रार न करता गुरुजींना साथ देणे हे सुद्धा गुरुजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आज अशा कर्मयोगी, शिक्षण महर्षी, दलित मित्र, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिस्तप्रिय प्रशासन, आदर्श संस्थाचालक, शिक्षण क्षेत्रातील संत, अहमदपूर पॅटर्नचे जनक डी.बी.लोहारे गुरुजींचा ८९ वा वाढदिवस निमित्त गुरुजींना उदंड, निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.कपिल बिरादार – यशवंत विद्यालय अहमदपूर
