बसवकल्याण येथील लिंगायत धर्म महाअधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
उदगीर (एल.पी.उगीले) : जागतिक लिंगायत महासभा बंगळुरुच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च 2023 रोजी बसवकल्याण जिल्हा बिदर येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन आयोजित केले आहे. महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या ऐतिहासिक बसवकल्याण नगरीत प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये लिंगायत,लिंगायत साहित्य,संस्कृती,इतिहास परंपरा आणि लिंगायत समाजाची सध्याची स्थिती आणि पुढील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर संशोधक,व्याख्याते व मठाधीश यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.अधिवेशनाचे उद्घाटन न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या शुभहस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत गो.रु.चनबसप्पा राहणार आहेत. राज्य व केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे स्वरुप उद्घाटन,मठाधिशांचे सत्र,महिला सत्र, युवा सत्र व समारोप असे आहे.या अधिवेशनात देशभरातील आणि विदेशातील समाज बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकातील व महाराष्ट्रातील लिंगायत व बसव संघटनांनी या अधिवेशनास पाठींबा दिला असून ते नियोजनात सक्रियपणे कार्य करीत आहेत. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष व माजी आय.ए.एस. अधिकारी शरण शिवानंद जामदार,बसवराज धनुरे,बाबुराव माशाळकर,कांता कलबुर्गे बुळ्ळा,शांता देशमुख व किशोर पाटील कौळखेडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.