लेखा अधिकाऱ्याला झाला कोरोना! सेवानिवृत्तांना पेन्शन काही मिळेना!!
लातूर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्ह्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी वाट पाहावी लागत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जवळपास 5000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मिळायचे, मात्र एक एप्रिल ला पेन्शन मिळाले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाटले की, मार्च अखेर असल्यामुळे कदाचित दोन-चार दिवस मागेपुढे आपल्याला पेन्शन मिळेल. मात्र तब्बल दहा दिवस निघून गेल्यानंतर हवालदिल झालेल्या पेन्शन धारकांनी कार्यालयामध्ये चकरा मारून पेन्शन च्या संदर्भात चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की, पेंशन विभागाचे काम पाहणारे लेखा विभागाचे प्रमुख लेखाधिकारी यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ते अॅसोलेशन मध्ये आहेत. त्यामुळे ते कार्यालयात येऊ शकत नाही. ते कार्यालयात न येण्यामुळे पाच हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. अशी बिकट परिस्थिती लातूर जिल्हा परिषदेत निर्माण झाली आहे.
त्यामुळे पेन्शन वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तृतीय श्रेणी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनासाठी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जवळपास पाच हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन मिळते. ही पेन्शन ची प्रक्रिया सर्व मॅन्युअल केली जात असल्याने सध्या कार्यालयांमध्ये अडचण निर्माण झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाच्या प्रमुखास कोरोना झाल्यामुळे ते कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. वास्तविक पाहता लेखा विभागातील महत्त्वाचा विभाग असल्याने यदाकदाचित एखाद्या कर्मचाऱ्यास, अधिकाऱ्यास काही समस्या उद्भवल्यास त्या पदाचा अतिरिक्त पदभार इतर एखाद्या तत्सम अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे होते. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले हे अधिकारी आणखी दहा पंधरा दिवस कार्यालयात येण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवले जात आहे. यामुळे एप्रिल महिन्याचे तर पेन्शन मिळालेच नाही मे महिन्याची पेन्शन लवकर मिळेल याची शाश्वती नाही. यामुळे हवालदिल झालेले सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये खेटे मारत आहेत.
एप्रिल महिन्यात 14 तारखेला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. जयंतीच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेनेला सामोरे जावे लागत असल्यामुळे तसेच ज्यांचा चरितार्थ निव्वळ पेन्शन वर चालतो. अशा लोकांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध असल्याने आणि सध्या कोरोनाचा दुसरा स्ट्रॉन सुरू असल्याने त्यांना सतत बाहेर फिरणे शक्य नाही. तसेच अनेकांना वेगवेगळ्या व्याधी, आजार झालेले आहेत. काहीजणांना कोरोनाचा संसर्ग सुद्धा झालेला आहे. अशा लोकांना वेळेवर आर्थिक मदत नाही मिळाल्यास त्यांचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात विशेषकरून मार्चअखेर मध्ये विभागाचा आढावा घेतला जात असतो. मात्र आता कोरोनाचा संसर्ग झालेले लेखाधिकारी कार्यालयात येत नसल्याने आणि त्यांचा पदभार रिक्त ठेवला गेल्यामुळे सेवानिवृत्त धास्तावलेले आहेत. लेखा प्रमुखांचा अधिभार इतर अधिकाऱ्याकडे सोपवला जावा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावेत. अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.