तरुणांनी मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरू नये – विशाल गिरी

तरुणांनी मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरू नये - विशाल गिरी

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. रजाकारांच्या अन्याय व अत्याचाराला मूठमाती देण्यासाठी कुटुंबाची व प्राणाची परवा न करता स्वातंत्र्यसैनिकांनी रात्रीचा दिवस केला. यामुळे हा लढा यशस्वी झाला. मुक्तिसंग्रामाचा लढा ऐकताना आजही अंगावर शहारे येतात. स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रनिष्ठा आजही आपल्याला सतत प्रेरणा देते. आजच्या तरुणांनी हा लढा नीटपणे समजून घेतला पाहिजे. याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे मत स्वातंत्र्यसैनिक दत्तूगीर गुरुजी तोंडचिरकर यांचे नातू उद्योजक विशाल गिरी यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या वतीने मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक या विषयावर मराठवाडास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार जिल्ह्यातून वरिष्ठ महाविद्यालयातील पंधरा स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सदरील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विशाल गिरी हे उपस्थित होते. तसेच मंचावर निबंध स्पर्धेचे परीक्षक डॉ.वर्षा निरगुडे व विजेते विद्यार्थी यांची उपस्थिती होती.प्रथमत: स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.धनराज बंडे यांनी करून दिला.पुढे बोलताना विशाल गिरी म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामात किसान दलाचे काम अभूतपूर्व स्वरूपाचे होते. त्यांनीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे म्हणून रणसिंग फुंकले. किसान दलातील दत्तूगीर गुरुजी तोंडचिरकर, तुकाराम पाटील तादलापूरकर, आप्पाराव पाटील कोळखेडकर यासारख्या इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लोकांचे संघटन करून रजाकरांच्या विरोधात बंड पुकारले. रजाकारांनी सर्व क्षेत्रात एक दहशत निर्माण केली होती. अशा काळात पारतंत्र्यात असलेल्या या परिसरातील लोकांना किसान दल आशेचा किरण वाटत होते.जेव्हा रझाकारानी दत्तूगीर गुरुजींना ताब्यात द्या असे म्हणाले. तेव्हा गावातील सगळेच लोक म्हणाले की, मी पोटचं देईन पण पाठच देणार नाही म्हणजेच या लोकांची स्वातंत्र्यसैनिकावर किती निष्ठा होती, हे लक्षात येईल. यावेळी विशाल गिरी यांनी खतगाव, रावणगाव, हत्तीबेट,रामघाट व चिखली येथील गढीवरील लढाई इत्यादी प्रसंग ओघवत्या भाषेत सांगत श्रोत्यांना अस्वस्थ व अंतर्मुख केले.अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याविषयी आजही वास्तव कथा खेड्यापाड्यात सांगताना लोक रागात बोलतात. इतकं या परिसरातील लोकांनी सहन केलेलं होतं.यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आले. प्रतीक्षा गजिले व सौरभ जगळपुरे या विजेत्या
विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळातील डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.जे.डी. संपाळे, प्रा.एन.आर हाके व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.म.ई. तंगावर तर आभार प्रा. मनोहर भालके यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!