दावणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ करण्यासाठी नव नवे तंत्रज्ञान, व आधुनिक पद्धतीने शेती करुन शेतकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन मानवता विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी नाब्दे तालुका कृषी अधिकारी, मोहन पाटील प्रगतिशील शेतकरी तथा कृषी तज्ज्ञ, म्हेत्रे कृषी सहाय्यक, बालाजी कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत माती परिक्षणाचे महत्व, सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचे नियोजन व उपाय योजना , शासनाच्या शेतकरी बांधवांसाठी कोण कोणत्या योजना चालू आहेत? याची माहिती, शेतकरी बांधवांसाठी विद्युत बील किती व कसे भरावे? तसेच शेतीची वीज तोडणीची नियमावली इत्यादि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम तीन ते साडेतीन तास चालला. यात गावातील शेकडो शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन वाढीचा विक्रम करणारे दहा शेतकरी यांची उत्पादन वाढीची कार्यपद्धती ही पुस्तिका 100 शेतकरी बांधवांना धनाजी मुळे व्हा. चेअरमन यांच्या मार्फत भेट देण्याचे घोषित करण्यात आले. याच कार्यक्रमात दावणगाव नगरीतील हज यात्रा करणारे पहिले युसूबसाहेब वाडीवाले यांचा प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश साखरे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशनराव बिरादार यांनी केले. सुत्र संचलन रमेश जाधव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उमाजी मुळे, हुसेन वाडीवाले,रफीक बागवान, पांडूरंग फुले, बाबूराव भंडे, सतीश हुरुसनाळे, संग्राम पताळे, संतोष पताळे, पुंडलीक भोळे, चंद्रकांत कांबळे, शेतकरी संघटनेचे कालिदास भंडे, इत्यादीनी प्रयत्न केले.
