गुत्तेदाराच्या गलथान व निकृष्ट पाईपलाईन मुळे अहमदपूरकरांना महिन्याला पाणी

गुत्तेदाराच्या गलथान व निकृष्ट पाईपलाईन मुळे अहमदपूरकरांना महिन्याला पाणी

शहरातील अनेक प्रभागात खोदूनही पाईपलाईन नाही
पाण्याच्या नवीन टाकीला लागली गळती

अहमदपूर [ गोविंद काळे ] : या शहरातील नागरिकांना चार दिवसाला पाणी मिळावे या उद्देशाने ४५ कोटी रुपयांची लिंबोटी धरणावरून नवीन पाईपलाईन ,शहरात पाईपलाईन करणे तसेच मोठे नवीन जलकुंभ बांधणे आणि लिंबोटी धरणातील नवीन विहिरीचे काम ही सर्व कामे सानप कन्स्ट्रक्शन यांनी सर्व गलथान कारभार करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे सर्व पाईपलाईन सतत फुटत असल्यामुळे शहराला एक महिन्याला पाणी मिळत आहे.यामुळे नागरिक खूपच वैतागले आहेत.यांनी केलेल्या निकृष्ट कामाची कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

लिंबोटी धरणातील विहीर जेथे बांधणे गरजेचे होते तेथे बांधण्यात आली नाही. गुत्तेदाराने मुद्दाम रुपये वाचविण्यासाठी चक्क दहा मीटर अलीकडे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. लिंबोटी धरणातून अहमदपूर शहराकडे करण्यात आलेली पाईपलाईन सतत कुठे ना कुठेतरी फुटत आहे, याचा शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. शहराला चार दिवसाला पाणी मिळणे अपेक्षित होते ते मिळत नाही, सानप कन्स्ट्रक्शन ने काम करतेवेळी पाईपलाईन इस्टिमेट नुसार जमिनीत खोल घालणे बंधनकारक होते पण दोन ते अडीच फूट खोल घातले आहे. पाईपलाईन इस्टिमेट नुसार योग्य दर्जाचे आहेत काय, योग्य साईज आहे की कमी आहे,मग हे सतत का फुटत आहे. याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच नवीन तयार करण्यात आलेल्या जलकुंभाला आत्ताच गळती लागलेली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सानप कन्स्ट्रक्शन मुळे नागरिकांना २५ दिवस ते एक महिन्याशिवाय नळाला पाणी मिळत नाही. नागरिकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या या गुत्तेदारांवर कडक कार्यवाही करून जनतेला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे.
या शहरातील अनेक महत्त्वाच्या व मध्यवस्तीत असलेल्या भागात अद्यापही नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. काही भागात रस्ते खोदून एक वर्ष झाली आहेत तरीपण नवीन पाईप टाकण्यात आलेले नाहीत. पाईप टाकायचे नसले तर चांगले रस्ते जेसीबीने का खोदून ठेवण्यात आले आहेत. हे गुत्तेदाराला नेतेमंडळी कोणी विचारणार काय. लिंबोटी धरणावरून केलेली पाईपलाईन व शहरातील नवीन पाईपलाईनचे काम चांगल्या दर्जाचे झाले असते तर नागरिकांना चार दिवसाला पाणी मिळाले असते.’ पाणी उशाला ,आणि कोरड घशाला ‘अशी परिस्थिती अहमदपूरकरांची झालेली आहे. धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. दररोज नळाला पाणी सोडले तर धरणात पाणी कमी पडत नाही. लिंबोटी वरून खुप दुर असलेल्या उदगीरला पाणी नेले आहे तेथे सुरळीत चालू आहे. पण अहमदपूर खूप जवळ असून गुत्तेदाराच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच शहरातील चांगले मजबूत, पक्के असलेले रस्ते जेसीबीने खोदल्यामुळे खराब झाली आहेत. हे सुद्धा गुत्तेदारांनी योग्य करणे आवश्यक होते पण गुत्तेदाराची येथे मनमानी होती. याला जाब विचारणारे नगराध्यक्ष ,नगरसेवक ,पक्षाचे नेते मूग गिळून का गप्प बसले आहेत. नागरिकांना चार दिवसाला नळाला पाणी मिळवून देण्यासाठी यांची जबाबदारी नाही काय ? पण जनता बिचारी गरीब आहे‌.त्रास सहन करीत आहे.याचा गैरफायदा घेणे योग्य नाही.
सानप कन्स्ट्रक्शन ला नगरपरिषदेने गलथान काम, कामात विलंब, निकृष्ट , मनमानी व इतर काही कारणासाठीच की काय ६९ लाख रुपये दंड बसविला होता. त्याला न्यायालयात खेचले होते. याबरोबरच याची सुरक्षा ठेव रक्कम ही त्याने पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष शहराला सुरळीत पाणीपुरवठा करून योग्य, चांगली व सुस्थितीत झाल्यानंतर नगरपरिषेकडे हस्तांतरण करणे बंधनकारक होते. पण यातले गुत्तेदाराने काहीही न करता तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याशी काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार केल्यामुळेच की काय जिल्हाधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर बसून नगरपरिषदेला सांगून गुत्तेदाराचे काहीही नुकसान होऊ न देता त्याला सर्व रक्कम परत करण्यात आल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
शहरातील नागरिकांना चार दिवसाला पाणी मिळावे यासाठी सर्व पक्षाचे नेते पूर्वीचे नगराध्यक्ष नगरसेवक हे प्रयत्न करणार काय सानप कन्स्ट्रक्शन या गुत्तेदाराला धडा शिकवणार काय याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे अन्यथा या येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जनता यांना धडा शिकवणार अशी चर्चा ऐकावयास मिळते आहे.

About The Author

error: Content is protected !!