कृषी उत्पन्न बाजार समिती तिरंगी सामना होणार? पाचव्या दिवशी ४७ नामनिर्देशन पत्र दाखल
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. २७ ते ३ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत असून गुरुवार ( दि. ३० ) पर्यंत चार दिवसांमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नव्हते. परंतु शुक्रवारी ( दि. ३१ ) पाचव्या दिवशी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण ४७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापूरकर यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी व महत्त्वाची आहे. बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उदगीरात राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून दिग्गजांचे तीन पॅनल या बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने भाजपचे पारडे जड होणार आहे. काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या अगोदरच भाजपच्या पारड्यात उड्या मारत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटातही चांगलीच खळबळ माजली आहेत. राष्ट्रवादीचे नेते आ. संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीचे एकच पॅनल असावे, अशी विनंती केली होती. मात्र त्यावरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे न ऐकता आपल्या व्यक्तिगत पातळी वरील हेवेदावे आणि आपसी दुश्मनी, यामुळे काही झाले तर महाविकास आघाडी पॅनलच्या प्रमुखांसोबत तडजोड करायला तयार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आणखी एक दिवस शिल्लक आहे. शुक्रवारी ( दि. ३१ ) बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदारसंघातून एकूण ३७ जणांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे , बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे , लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , माजी जि. प. सदस्य शिवाजी केंद्रे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील , सूर्यशिला मोरे , रामराव बिरादार , पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले , राजेश्वर पटवारी , कैलास पाटील , लालखा पठाण यांच्यासह एकूण ३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून एकूण ६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून त्यात गुरुनाथ बिरादार , ज्ञानेश्वर पाटील , रंजीत पाटील आदींचे अर्ज आहेत. व्यापारी मतदारसंघातून सचिन शिवाजीराव हुडे यांच्या सह अन्य दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर हमाल व तोलारी मतदारसंघातून शुक्रवारी गौतम गोविंदराव पिंपरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. असे एकूण ४७ नामनिर्देशन पत्र शुक्रवारी दाखल झाले आहेत. दिनांक ३ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. दिनांक ५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. तर दिनांक ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तर दिनांक २१ एप्रिल रोजी अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. तर २८ एप्रिल रोजी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरची महत्वाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतील गटबाजी निश्चितपणे भावी निवडणुकीला वेगळे चित्र निर्माण करणारी ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले यांचा पाठिंबा कोणाला हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
