भीमोत्सवच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त भीमोत्सव २०२३ च्या वतीने विविध समाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत हे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती भीमोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी यांनी दिली आहे.
भीमोत्सवच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ एप्रिल रोजी राधाई ब्लड बँकेत रक्तादान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ एप्रिल रोजी उदगीर येथील सर्व नविन शासकीय इमारत परिसरात माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते १३२ वृक्षलागवड करण्यात येणार आहेत. दि. १० एप्रिल रोजी सर्वरोग निदान आरोग्य शिबीर महात्मा फुले नगर येथे घेण्यात येणार आहे. दि. ११ एप्रिल रोजी चंद्रमणी बौद्ध विहारात महात्मा फुले यांची जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. १२ एप्रिल रोजी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अभिवादन कार्यक्रम तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत अन्नदान कार्यक्रम व सायकांळी ५ ते जयंती मिरवणूक संपेपर्यंत सर्व जयंती महोत्सव समितीचे स्वागत कॉर्नर चौक येथे करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास आंबेडकर प्रेमींनी उपस्थीत राहावे, असे आवाहन भीमोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
