उन्हाचा कडाका वाढला तापमान ३८ अंशावर

उन्हाचा कडाका वाढला तापमान ३८ अंशावर

औसा (प्रशांत नेटके) : तालुक्यात कोरोना या महाभयंकर विषाणूंने हैराण करून सोडलेले असतानाच आता सूर्यनारायणाने उग्र रूप धारण केले आहे. उन्हाचा पारा वाढल्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत.

शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू आहेत. शेतकरी शेतमजूर उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी ६ वाजताच तर सायंकाळी ४ नंतर शेतीकामाला प्राधान्य देत आहेत.

उन्हाचा पारा चढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. त्यातच दुपारच्या वेळी विजेचा अधून मधून लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रासले आहेत. दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हात नागरिक घराच्या बाहेर न पडता घरामध्ये फॅन व कुलरची हवा घेत आहेत. मागील काही दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे .दुपारी १२ ते ३:३०च्या कालावधीत ३८ ते ४० तापमान नोंदले जात आहे.

शेतकऱ्यांची शेतीची उन्हाळी कामे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांनी आता रब्बी पिकांची काढणी मळणी केली असून आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत सुरू असून उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेताची नांगरट करून जूनमध्ये खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतात. अशातच आता कडाक्याची उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी अथवा शेतमजूर सायंकाळी व सकाळी कामाला प्राधान्य देत आहेत. काही शेतकरी सकाळी ६ वाजताच काम सुरू करून १० ते ११ वाजेपर्यंत काम संपवतात, परत सायंकाळी कामाला प्राधान्य देत आहेत.

(औसा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक कामासाठी सवलत मिळण्याने बाजारपेठेतील होणारी गर्दी कमी झाली आहे. उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.)

About The Author