कोरोना लसीकरणाची सोय करण्याची मागणी
लामजना (प्रशांत नेटके) : सध्या प्रशासनाच्या वतीने कोव्हिडं लसीकरण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविली जात आहे.
औसा तालुक्यातील लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे तपसे चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्राअंतर्गत तपसे चिंचोली गावात लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
तपसे चिंचोली गावाची लोकसंख्या चार हजाराहून अधिक आहे.तपसे चिंचोली गावची ग्रामपंचायत गाडवेवाडी, लाडवाडी आदी गावांना जोडली आहे. तपसे चिंचोली येथे आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज अशी इमारत आहे. असे असले तरी तेथील ज्येष्ठ नागरिकांना सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्याव लागत आहे.
परंतु लामजना येथे ये जा करण्यासाठी एसटीची सोय नसल्याने आणि खाजगी वाहने वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तपसे चिंचोली ते लामजना या मार्गावर वाहनांची सोय नसल्याने जाण्यायेण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे कडक उन्हात जाण्याचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतुकीची सोय नाही – वाहतुकीची सोय नसल्याने अनेकजण कोरोना लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळेच तपसे चिंचोली येथील नागरिकांसाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या वतीने तपसे चिंचोली गावातच कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.