एकाकी ज्येष्ठ नागरिकांना पुरविणार घरपोच औषधे, गरजेच्या वस्तू – भाजपच्या जिल्हा सचिव शैला मिर्झापूरे यांचा उपक्रम
यवतमाळ (राम जाधव) : मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेत. अन् वृद्ध एकाकी पडले. त्यांची गाव सोडायची इच्छा नाही. पण, उतारवयात मदतीला कोणीच नाही. कोरोनाच्या काळात सुश्रृषा कोण करणार, दैनंदिन वापराच्या वस्तू कोण आणून देणार, ही काळजी पन्नाशी ओलांडलेल्या प्रत्येकच नागरिकांना सतावते आहे. आता लोहारा परिसरात राहणार्या अशा ज्येष्ठ नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सचिव व प्रसिद्ध समुपदेशक शैला मिर्झापूरे यांनी ’सेवा मातापित्यांची’ हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत लोहारा परिसरात वास्तव्यास असलेल्या व एकाकी राहत असलेल्या 50 पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डॉक्टरांची सेवा, औषधे, पॅथॉलॉजीची सेवा, जेवणाचा डबा, दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा वस्तू, भाजीपाला आदी सेवा पोहोचविली जाणार आहे. अनेकांचे दरमहिन्याचे विजेचे बिल, पाण्याचे बिलसुद्धा भरण्यास मदत करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून मोफत सेवा पुरविली जाणार आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप नेते मदन येरावार व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती शैला मिर्झापूरे यांनी दिली आहे. ज्या वृद्धांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 8177981355 किंवा 8308914749 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या सुविधेसाठी लवकरच एक अॅप तयार करण्यात येणार असल्याचेही मिर्झापूरे यांनी सांगितले. या अभियानात लोहारा येथील अष्टविनायक क्लिनिकच्या डॉ. अर्चना गाडे, बाजोरियानगरस्थित श्री राम क्लिनिकच्या डॉ. कविता बोरकर, साई क्लिनिकचे डॉ. अतुल गुल्हाने, ऑटोचालक गुणवंत भोजापूरे, लक्ष्मी मेडिकल लोहारा, आदींनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.