मोठी बातमी : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक

मोठी बातमी : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक

लातूर ( एल. पी. उगिले ) : लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराने गंभीर असणाऱ्या रुग्णावर रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी असल्याने या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक या इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून हे इंजेक्शन हस्तगत करून घेत आहेत. अनेक ठिकाणी हे इंजेक्शन काळ्याबाजारात चक्क 50 हजार रुपयाची एक प्रमाणे विक्री केली जात आहे. अशी माहिती हाती येताच लातूर येथील एमआयडीसी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 रेमडेसिविर इंजेक्शन व सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले व त्यांच्या पथकाने काळ्याबाजारात विक्री होणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या तयारीत असलेले ऋषिकेश माधव कसपटे, शरद नागनाथ डोंबे, ओम सुदर्शन पुरी, ओमप्रसाद हणमंत जाधव, किरण भरत मुदाळे, सिद्धेश्वर राजेंद्र सुरवसे या सहा जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाकडून या औषधाची खात्री झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

 या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे सहा जनही लातूरच्या विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्क करून काळ्याबाजारात हे इंजेक्शन प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्या वरून त्यांनी यासंदर्भात सापळा रचून गुप्त बातमी दारा मार्फत माहिती घेऊन तपास केला. या सहा जणांची या काळ्या बाजारासाठी एक साखळी निर्माण झाल्याचे ही पोलिसांच्या लक्षात आले, यापैकी काहीजण विशिष्ट लॅब मध्ये कार्यरत आहेत. हे आरोपी इंजेक्शन कोठून उपलब्ध करायचे? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात विवेकानंद पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चर्चा थांबते ना थांबते तोच, पुन्हा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याने रेमेडेशिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्या आता आठ वर पोहोचले असून ही एक टोळीच असावी. असा अंदाज पोलिसांना येऊ लागला आहे.

 या संदर्भाने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यामधील विविध ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत म्हणून पोलिस पथके निर्माण केल्याची ही माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती असताना अशा पद्धतीचा काळाबाजार करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून नैतिकता आणि माणुसकीचे आध:पतन झाल्याचे चित्र समोर येत आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आणि हे प्रकार थांबावेत. अशी मागणी रा स प च्या च्या वतीने करण्यात आली आहे.

About The Author