७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19,462 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच 2,663 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत 18,786 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 7,028 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 34 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधपणे परराज्यातील मद्य विक्री बाबत आतापर्यंत एकूण 765 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 656 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 13 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण 182 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 214 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर चार कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण 71 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 79 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दोन कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
22 डिसेंबर 2020 पर्यंत परराज्यातील अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे. 4 डिसेंबर 2020 रोजी नाशिक येथे हरियाणा आणि गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 1,076 बॉक्स आणि एक ट्रक असा एकूण 93 लाख 63 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
6 डिसेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 500 बॉक्स आणि एक ट्रक असा एकूण 43 लाख 92 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच 6 डिसेंबर 2020 रोजी धुळे येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 1250 बॉक्स आणि दोन वाहने असा एकूण 65 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2020 रोजी सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 150 बॉक्स आणि मद्य बाटल्यावरील 20,000 बनावट लेबल असा एकूण 11 लाख 81 हजार 010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
18 डिसेंबर 2020 रोजी पुणे येथे विविध मद्याच्या एकूण 710 बॉक्स,बिअरचे 190 बॉक्स आणि 1 ट्रक असा एकूण 56 लाख 48 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
23 डिसेंबर 2020 रोजी कणकवली येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे 2,700 ब.लि. मद्य आणि एक टेम्पो असा एकूण 21 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
15 डिसेंबर 2020 रोजी अंधेरी आणि वांद्रे येथून विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या एकूण 97 सिलबंद बाटल्या आणि तीन वाहने असा एकूण 10 लाख 23 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सहा आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
16 डिसेंबर 2020 रोजी चेंबूर येथून बनावट विदेशी मद्याच्या एकूण 348 बाटल्या असा एकूण 22 लाख 04 हजार 392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2020 रोजी बनावट विदेशी मद्याच्या 20 बॉटल आणि एक रिक्षा असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ आणि ईमेल excisecontrolroom@gmail.com यावर करु शकतात.