शिवाजीराव हुडे यांच्या निवडीला आव्हान, राजकीय वर्तुळात खळबळ!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या निवडणुकांच्या दरम्यान शिवाजीराव हुडे हे अचानक भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून पूर्वगृही अर्थात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कर्ते झाल्याने, आणि तेच महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख ठरल्याने, काँग्रेस पक्षातील पूर्वनियोजित राजकारणाची पूर्ण घडी विस्कटली होती. त्यामुळे शिवाजीराव हुडे यांच्या नामनिर्देशन पत्रालाच आव्हान देऊन नामनिर्देशन पत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती. ती मागणी ग्राह्य धरून उदगीर येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले होते. त्या विरोधामध्ये शिवाजीराव हुडे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था) यांच्याकडे नामनिर्देशन पत्राचा फेरविचार करावा म्हणून अपील केले होते. उदगीर येथे आपला नामनिर्देशन अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे, तो चुकीच्या पद्धतीने ठरवला गेल्याचे म्हणणे मांडले होते. अर्थात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 10(2) (दोन) प्रमाणे एखाद्या व्यक्तीची मुख्य प्राप्ती शेतीपासून नसेल किंवा त्याच्याजवळ व्यापाऱ्याची अनुज्ञप्ती असेल किंवा ज्या कुटुंबाजवळ किंवा पेढि जवळ व्यापाऱ्याची अनुज्ञप्ती आहे, अशा एकत्र कुटुंबात किंवा पेढीमध्ये त्यांचे हित संबंध असेल तर त्या व्यक्तीची शेतकऱ्यांसाठी असलेल्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारा सदस्य म्हणून निवड करता कामा नये. असे नमूद केले आहे. या मुद्द्याला धरून आक्षेप नोंदवला होता. त्या आक्षेपाच्या विरुद्ध आपले मत नोंदवताना फेरविचार याचिकेमध्ये शिवाजीराव हुडे यांनी ज्या फर्मच्या अनुषंगाने आपल्यावर आक्षेप घेतलेला आहे, त्या फॉर्मच्या भागीदारीचा राजीनामा आपण यापूर्वीच दिलेला आहे. असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सदर फर्मसी अपीलकर्त्याचा कोणताही संबंध नाही, अपीलकर्त्यांनी हिस्सा हस्तांतरित केलेला आहे. त्यामुळे निवडणूक नियम 2017 मधील नियम 10(2) (दोन) मधील तरतुदी अपीलार्थी यांना लागू होत नाहीत, असे म्हटले होते. सदरील म्हणणे योग्य आहे असे म्हणून अपिलामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी शिवाजीराव हुडे यांचा अर्ज वैध ठरवला होता. त्यानंतर निवडणुका संपन्न झाल्या, आणि त्या निवडणुकांमध्ये शिवाजीराव हुडे हे विजयी झाले. तशा पद्धतीचा अधिकृत निकालही जाहीर झाला. पुन्हा रमेश पंढरीनाथ भंडे आणि धनाजी सटबा गंगनबीडे या दोघांनी सदरील निकालाच्या विरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करून शिवाजीराव हुडे हे व्यापारी असून त्यांनी शेतकरी म्हणून लढवलेली निवडणूक रद्दबातल ठरवावी, कारण ते सचिन ऍग्रो प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड आणि सचिन अग्रो फुड एलएलपी या दोन कंपनीशी संबंधित असून भागीदार आहेत, असे सांगितले आहे. तसेच शिवाजीराव हनुमंतराव हुडे यांच्या नावाने बाजार समितीने आडत व्यापाराचा परवाना देऊन त्यांना व्यापार करण्यासाठी बाजार समितीचा प्लॉट नंबर 35 लिजवर दिलेला आहे. तो आजतागायत प्लॉट त्यांच्या ताब्यात असून त्या प्लॉटवर त्यांचा व्यापार चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (विकास व विनिमय) कायदा 1963 आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (विकास व विनिमय) 1967 चा कलम 2(1)(b) अन्वये शिवाजीराव हुडे शेतकरी ठरू शकत नाहीत. बाजार समितीने दिलेला प्लॉट नंबर 35 हा आजही नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर शिवाजीराव हुडे यांच्याच नावाने आहे. त्यामुळे त्यांचा निकाल रद्दबातल ठरवावा, अशी मागणी केली आहे.
माझी बदनामी करण्याचा कट
गेल्या पंधरा वर्षांपूर्वीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर मी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आलो आहे. इतकेच नाही तर दहा वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून पाच वर्ष यशस्वी कारभार पूर्ण केला आहे. या दरम्यान अनेक विकासाच्या आणि लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत, असे असतानाही पुन्हा पुन्हा मी शेतकरी नाही, व्यापारी आहे. म्हणून माझ्या विरोधात अर्जफाटे करून जनमानसामध्ये माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा खुलासा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक तथा संभाव्य सभापती शिवाजीराव हुडे यांनी केला आहे.