विज्ञाननिष्ठ आणि नीतिमान समाज निर्मितीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ – माधव बावगे
उदगीर (एल.पी. उगिले) : समाजामध्ये जेव्हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण होतो, आणि त्या दृष्टिकोनाला नीतिमत्तेची जोड असते. त्यावेळेस तो समाज निर्भय व नीतिमान म्हणून काम करायला लागतो. अशा पद्धतीचा समाज निर्माण करण्यासाठीच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अघोरी प्रथा बंद करण्यासाठी प्रबोधन करणे, त्यासोबतच लोकांच्या आर्थिक, धार्मिक, मानसिक शोषण थांबवण्यासाठी लोक जागृती करण्यासाठी, विविध उपक्रमाद्वारे आणि कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा व चमत्कार विरोधी कायद्याची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आहे. असे विचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालय आणि दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना द्वारे आयोजित युवा युवती प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माधव बावगे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीरचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव सुधीर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे, योग गुरु शिवमुर्ती भातंब्रे, अरविंद सोनटक्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सुधीर भोसले यांनी चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण करून धर्माच्या नावावर बुवाबाजी करून अधर्माचे आचरण करणाऱ्या बुवाबाजीला आळा घालावा, असे आवाहन केले.या प्रसंगी बोलताना डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
