चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीचीही आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीचीही आत्महत्या

 पुणे (रफिक शेख) : पती-पत्नीमधील विश्वासाच्या नात्याला तडा गेल्यास त्यांच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणून पुणे येथे घडलेल्या वडगाव शेरी भागातील घटनेकडे पाहता येईल. कोरोना विषाणूचा संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केल्यानंतर मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या योगेश गायकवाड याच्या हातचे काम गेले. त्यामुळे तो घरीच राहू लागला. मात्र घर चालवायचे कसा? असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची पत्नी उषा योगेश गायकवाड (वय 28 वर्ष) हिने शेजारीपाजारी घर काम, भांडी धुणे करून घर खर्च चालवायला सुरुवात केली. मात्र आपल्या पत्नीचे बाहेर कामधंद्यासाठी जाणे योगेश ला आवडत नव्हते. त्यामुळे तो सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यातून मग दोघांमध्ये संघर्ष होऊन सतत वाद सुरू झाला.

 या कुटुंबियांना दोन मुले असून ते आपल्या मुलासह राहत होते. आपली पत्नी चार पैसे कमवते म्हणून आपल्याला उलट बोलते. असे वाटल्यावरून योगेश याने सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुले झोपी गेल्यानंतर पत्नीचा गळा दाबून खून केला. हा प्रकार दाबला जाणार नाही, पोलीस आपल्याला पकडणाराच! या भितीपोटी मग त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे त्या कुटुंबीयांची दोन मुले उघड्यावर आली आणि त्यांचा संसार उध्वस्त झाला.

 मंगळवारी सकाळी मुले उठल्यानंतर ही घटना लोकांच्या लक्षात आली, आणि मग या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांना कल्पना देण्यात आली. चंदन नगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कापरे यांनी या घटनेच्या संदर्भात माहिती दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. संशयामुळे एका सुखी संसाराची राखरांगोळी झाली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडावून मध्ये अनेक बेरोजगार आणि बेकार झालेल्या तरुणांची मानसिकता उद्विग्न झाली आहे. चिडचिडा स्वभाव बनला आहे, यातूनच असे प्रकार घडत असावेत अशी चर्चा परिसरात चालू आहे.

About The Author