तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचा शेतकरी हिताचा महायज्ञ कंधारमध्ये ही चालूच
कंधार ( एल. पी. उगीले ) : एखाद्या अधिकाऱ्याने मनात संकल्प करून आपल्या भागातील शेतकऱ्यांचे हित करायचे ठरवल्यास काय काय करता येऊ शकेल? याचे धडे शिकाऊ महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विद्यमान स्थितीत कंधार येथे तहसीलदार असलेले व्यंकटेश मुंडे यांच्याकडून घ्यावेत. महसूल प्रशासन म्हटले की, प्राधान्यक्रमाने शेती विषयक न्यायनिवाडे आणि प्रश्न ओघानेच आले! मराठवाड्यातील ग्रामीण भागात शेतीवर अपार प्रेम करणारा शेतकरी, साधे आपल्या शेतातून जाणारी वाट जरी दुसर्याला द्यायची म्हटली तर लगेच विरोध करतो. धूराबंधार्यावरून देखील वाट जाऊ देत नाही आणि अशाच कारणाने गेल्या कित्येक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच उपलब्ध राहिलेला नाही. त्या शेतकऱ्यांनी शेतात जायचे कसे? शेतात पिकलेला माल आणायचा कसा ?गुरेढोरे शेतात घेऊन जायची कशी? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत असतात. मात्र या सर्व प्रश्नांची जाण ठेवून अत्यंत सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामीण पातळीवरील अनेक ग्रामीण समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे त्यांचा खास हातखंडा आहे. उदगीर परिसरातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले होते. तीच हातोटी आणि तोच आदर्श कायम आपल्या डोळ्यासमोर ठेवून कंधार मध्येही ते कार्यरत झालेले आहेत! मागील पंधरा वर्षापासून हासुळ शिवारातील शेती कडे जाण्याचा रस्ता न्यायाच्या प्रतीक्षेत होता. अनेक वेळा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जायला रस्ता मिळावा, म्हणून महसूल प्रशासनाकडे अर्ज फाटे केले होते. मात्र त्याला सतत कोलदांडा घालण्यात येत होता.
मात्र जेव्हा तहसीलदार म्हणून व्यंकटेश मुंडे कंधारला आले, तेव्हा त्यांनी असे अनेक प्रकरणे हाताळायला सुरुवात केली. कुरूळा येथून जवळच असलेल्या हासुळ शिवारातील शेती गट क्रमांक 219 व 220 मध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता कालांतराने बंद करण्यात आला होता. नागोराव भोरगिर, सुमनबाई भोरगिर, आनंदा भोरगीर आणि शंकर भोरगीर यांनी या जागेतून जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव केला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी तत्कालीन अधिकार्यांकडे अर्ज फाटे केले होते. शेतकऱ्यांना आश्वासनही मिळाली होती, मात्र प्रत्यक्षात कंधार येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे जेव्हा रुजू झाले, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेऊन या कामाला न्याय मिळवून दिला.
तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी शेख, तलाठी ए. आय. अन्सारी, कुरळा बीट जमादार सुभाष चोपडे, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी केंद्रे यांनी जाय मोक्यावर उपस्थित राहून वर्षानुवर्ष सतावणारा प्रश्न निकाली काढून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला.
शेतीत साधनांची ने आण करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाचा वाढता वापर ! यामुळे शेतीसाठी रस्ते अपरिहार्य बनले आहेत. त्यातच वडिलोपार्जित शेती कडे जाण्यासाठी विशिष्ट हद्दीपासून असणारे रस्ते कालांतराने वादविवादातून बंद होतात, आणि ही शेतकऱ्यांची अडचण प्रशासनाची डोकेदुखी बनते. वेळप्रसंगी समूहाच्या विरोधात न्याय देणे जिकिरीचे असते. कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला असून सर्वांना समजावून सांगून त्यांनी मार्ग काढला आहे. अशाच पद्धतीने कंधारेवाडी येथील पानंद रस्ता देखील अनेक वर्षापासून रखडला होता. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, देखभाल, पेरणी, काढणी, शेतीमालाची वाहतूक आदीसाठी ये-जा करण्यासाठी गत अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेतून कच्चा रस्ता करण्याच्या 142 प्रस्तावाला मंजुरी दिली. सद्यस्थितीत पदरमोड करत बारा गावातील 22 रस्ते 32 किलोमीटरचे करण्यात आले! त्यात कवठा वाडी एक रस्ता 2.05 किलोमीटर, कंधारे वाडी येथे एक रस्ता एक किलोमीटर, पानशेवडी चे तीन रस्ते सहा किलोमीटर, घोडजचे तीन रस्ते पाच किलोमीटर,कुरूळा येथील दोन रस्ते तीन किलोमीटर, दिग्रस बुद्रुक तीन रस्ते तीन किलोमीटर, राहाटी चार रस्ते चार किलोमीटर, बारूळ दोन रस्ते चार किलोमीटर, गोणार एक रस्ता एक किलोमीटर, चौकीधर्मापुरी एक रस्ता एक किलोमीटर, उमरगा खो. एक रस्ता एक किलोमीटर, व खुड्याची वाडी एक रस्ता एक किलोमीटरचा समावेश यामध्ये आहे. शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड बाजूला काढून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि अत्यंत सामंजस्यातून तहसीलदार मुंडे यांनी हे रस्ते निकाली काढले आहेत. अशाच पद्धतीचे कारतळा ग्रामपंचायत अंतर्गत देखील पाणंद रस्त्याचे काम त्यांनी पूर्ण केली आहेत.
एकंदरीत शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव शेतकऱ्याच्या बांधावर हजर राहून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेणारा अधिकारी म्हणून व्यंकटेश मुंडे यांची ओळख आता कंधार परिसरात होऊ लागली आहे. शेकडो रस्ते मार्गी लावले असूनशेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून स्वतःला समाधान मानणारा हा अधिकारी आहे. अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे.