ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था, वाहनधारकांना कसरत करत जावे लागते
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बऱ्याच जोड रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विशेषत: तालुक्यातील गुडसूर ते घोणसी या साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून दुचाकी धारकांना चालणे देखील कठीण झाले आहे. छोटे मोठे अपघात होऊ लागले आहे. वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी खडी टाकलेली आहे, मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. उदगीर व जळकोट तालुक्याला जोडणारा गुडसूर ते घोनसी हा रस्ता आहे. या रस्त्याचे मागच्या दोन ते तीन वर्षांपूर्वीच काम झाले आहे. मात्र कामाचा दर्जा अगदी सुमार असल्यामुळे हा रस्ता लगेच उखडला गेला आहे. काही दिवसातच उखडला गेलेला या रस्ता आता खड्डेमय बनला आहे. अल्पावधीतच खराब झालेल्या या रस्त्याचे पुन्हा काम करावे, म्हणून ग्रामीण भागातून सतत मागणी होत होती. तो जनरेटा विचारात घेऊन या कामासाठी पुन्हा निधी मंजूर झाल्याच्या समजते. मात्र मागच्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम करण्यासाठी खडी जरी आणून टाकलेली असले तरी अद्यापही काम सुरू झालेले नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ नागरिकावर येऊ लागली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील काहीही फलीत मिळत नाही. संबंधित विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांच्या जीवावर प्रवास बेतू शकतो. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांची ही गंभीर समस्या विचारात घेऊन तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.