जुगार अड्ड्यावर धाड १७ जणांविरुद्ध गुन्हा ; ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त !
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवत मौजे नळगीर येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाकीखालील खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना वाढवणा पोलिसांनी धाड टाकून जुगाराचे साहीत्य , रोख रक्कम व १२ मोबाइल असा एकूण ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळणाऱ्या १७ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , नळगीर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागील ओढ्याच्या कडेला पाण्याच्या टाकी खालील खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती वाढवणा पोलिसांना मिळाली. वाढवणा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड , पोलीस हवालदार भास्कर सूर्यकर , शिवाजी सोनवणे , पोलीस नाईक इकराम उजेडे , पोलीस शिपाई वाडकर यांच्या पथकाने नळगीर येथे जाऊन सुरू असलेल्या तिर्रट नावाचा जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. पाण्याच्या टाकी खालील खोलीमध्ये एकूण १७ जण दोन डावात वर्तुळाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून तिर्रट जुगाराचे साहीत्य व नगदी रोख रक्कम सात हजार ७४० रुपये , ७९ हजार ९१० रुपये किमतीचे १२ मोबाइल असा एकूण ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या त्या १७ जणांना ताब्यात घेतले. पोलीस नाईक इकराम बशीरसाब उजेडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भिमाशंकर धोंडीबा सुतार , असीफ दस्तगीर शेख , ओमकार शिवानंद बंडे , बालाजी दिलीप बेल्लाळे , नामदेव शंकर माने , हुसेन युसुफ शेख , दिनकर भोजा पवार , मुसा मस्तान कुरेशी , विपुल गुंडेराव सुळकेकर , विनायक भोजा पवार , विकास शिवाजी पवार , संतोष शंकर पवार , सुनील भोजा पवार , संतोष राजाराम पवार , अंकुश दिगांबर पवार , नामदेव प्रल्हाद पवार , सिध्देश्वर अशोक सकनुरे यांच्याविरुद्ध गु. र. नं. १९७ / २३ कलम ५ , १२ (अ ) म. जु. का. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी सोनवणे हे करीत आहेत.