खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास होतो- डॉ. भास्कर माने

खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास होतो- डॉ. भास्कर माने

अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या काळामध्ये मोबाईलचा अतिवापर होत असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण दिशाहीन होत आहेत. त्यांना योग्य दिशा देण्याचे काम तसेच, त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी खेळच आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘ब’ झोनचे अध्यक्ष तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉ. भास्कर माने यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘ब ‘ झोन विभागीय अंतर महाविद्यालय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर ; विचारमंचावर निवड समिती सदस्य डॉ. चंद्रकला हनुमंते मॅडम, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी तसेच, संयोजक क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.भास्कर माने पुढे म्हणाले की, आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा कल खेळाकडे कमी आणि इतर गोष्टीकडे जास्त दिसून येतो, ही फार मोठी शोकांतिका आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होऊन आपला वैयक्तिक विकास साध्य करावा ते म्हणाले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आल्या. तसेच, कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त कु. ज्ञानेश्वरी शिंदे चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, खेळातूनच खिलाडूवृत्ती निर्माण होते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. तसेच, एक काळ असा होता की, खेळाडू हा देशासाठी खेळत असे परंतु आजच्या काळात खेळाडू देशासाठी खेळतो तो कधीही स्वतःसाठी खेळत नाही. असेही ते म्हणाले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ. प. प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर ; प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी केले व आभार क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच टीम मॅनेजर डॉ. नारायण जायभाये, पंच राहुल वाघमा,रे महफूज खान पठाण, गणेश पांचाळ, राहुल चंदेल, निलेश डोंगरे, आदित्य ससाणे यांच्यासह विविध महाविद्यालयातून आलेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author