आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाला चॅम्पियनशिप
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तृतीय चॅम्पियनशिप जिंकून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर ‘ ब’ झोन विभागीय आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले महाविद्यालयाच्या अश्विनी फड या विद्यार्थिनीने सेबर या प्रकारात सिल्वर पदक मिळविले आहे, तर फाॅईल मध्ये तिला ब्रांझ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ज्योत्स्ना मचकंटे या विद्यार्थीनीला सेबर मध्ये ब्रांझ पदक मिळाले आहे. तसेच वैष्णवी नागरगोजे या विद्यार्थिनीला ईपी मध्ये ब्रांझ पदक मिळाले तर काकणाजी सुरनर या विद्यार्थ्याला फाॉईल मध्ये ब्रांझ पदक तर शेख अल्ताफ या विद्यार्थ्याला सेबरमध्ये सिल्वर आणि फाॅईल मध्ये सिल्वर पदक मिळाले आहे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींचा तलवारबाजी संघ ‘ ब’ झोन विभागीय स्पर्धेत सर्व तृतीय विजेता ठरला असून मुलांच्या संघानेही सर्व तृतीय चॅम्पियनशिप पटकावली आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तलवारबाजीतील राष्ट्रीय खेळाडू तथा अहमदपूर सज्जाचे तलाठी श्री महेश गुपिले हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉ. भास्कर माने, पंच डॉ. राहूल वाघमारे, डॉ. चंद्रकला हणमंते, डॉ. नारायण जायभाये, महफूज खान पठाण, गणेश पांचाळ, राहूल चंदेल, निलेश डोंगरे, आदित्य ससाणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले; तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ अभिजीत मोरे यांनी आभार मानले.