वलांडी शिवारात पिकअप चालकाचा खून

 उदगीर (एल पी उगिले) : देवणी तालुक्यातील वलांडी येथे पिकअप चालकाचा दगडाने ठेचून खून करून त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप व्हॅन, खिशातील कागदपत्र आणि मोबाइल घेऊन आरोपी फरार आहे.

 यासंदर्भात पोलिसाकडून हाती आलेली   माहिती अशी की, मूळचे बिहारीपूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम बिदर रोड उदगीर येथे राहणारे बालाजी शेषराव बनसोडे पाटील हे उदगीर येथे गेल्या सात वर्षांपासून उदयगिरि मल्टी सर्विसेस या नावाने पिकअप व्हॅन चा व्यवसाय करतात. ते उदगीर हुन निलंग्याला गेले होते. निलंगा इथून उदगीर कडे परत येत असताना वलांडी जवळ आल्यानंतर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या भावाला फोन करून आपण उदगीर कडे येत असून सध्या वलांडी जवळ आहोत, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा फोन लागला नाही. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ उमाटे यांच्या शेतशिवारात बालाजी शेषराव बनसोडे पाटील यांचा मृतदेह आढळून आला.मृतदेहा शेजारी पडलेल्या विजिटिंग कार्ड वरून पोलिसांनी तपास केला असता मयताची ओळख पटली. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस तपास पथकाला आवश्यक सूचना केल्या.

 या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजीत काथवटे, दबडवार, विनायक कांबळे, सरफराज गोलंदाज, राजपाल साळुंके हे अधिक तपास करत आहेत. बालाजी बनसोडे यांचा भाऊ राजेश बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुरनं. 184/  21 कलम 302, 201 भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयताची ओळख पटू नये, म्हणून मयताच्या डोक्यावर, तोंडावर दगडाने जबर मारहाण करून चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी तपासासाठी स्वतंत्र तपास पथक बनवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कामटेवाड यांनी दिली आहे.

About The Author