लातूर जिल्ह्यातील आंबेडकरवादी चळवळीतील बुद्धिजीवींनी भाजपचा कुटील डाव ओळखावा – निवृत्तीराव सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण लातूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार सुधाकरराव शृंगारे करत आहेत. परवाचा अहमदपूर येथे कार्यक्रम कार्यक्रम आता उदगीर शहरात बौद्ध धम्म परिषदेच्या गोंडस नावाखाली भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा घाट घातला आहे. उदगीर पाठोपाठ रेनापुर निलंगा लातूर या तालुक्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढत आहेत.
भारतीय जनता पक्षाची खरी भूमिका ही मनुवादी असून गोरगरीब दलितांचे शोषण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. आकर्षक आणि भुरळ घालणाऱ्या घोषणा आणि गोंडस आश्वासने याच्या बळावर सर्वसामान्य माणसाला वेड्यात काढून, राजकीय स्वार्थ साधण्याचा घाट वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांनी घातलेला आहे. असे असताना देखील लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी उदगीर शहरात बौद्ध धम्म परिषद ठेवून आपण धर्मासाठी फार मोठे काहीतरी करतो, समाजासाठी काहीतरी करतो असा दिखावा सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील डाव बौद्ध धम्मातील उच्चविद्याविभूषित कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव यांनी वेळीच ओळखावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून ज्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवला होता, त्याच मनुस्मृतीची शिकवण देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठे करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या भावनेशी खेळून, बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे ओळखून अशा राजकीय परिषदेला वेळीच थांबवणे गरजेचे आहे. असे विचार भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या साडेचार वर्षात लातूर जिल्ह्याच्या खासदारांनी समाजासाठी आणि या परिसरासाठी कोणतेही विकास कार्य केलेले नाही, किंवा समाजातील कोणत्याही कार्यकर्त्याला मदत केलेली नाही. आता निवडणुकीचे बिगुल वाजताच त्यांना समाजाची आठवण आली आहे. काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून आणि भावनिक आवाहन करून त्यांनी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असले तरी या आयोजना मागचा खरा हेतू हा शुद्ध नसल्यामुळे बुद्धिजीवी नागरिकांनी अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे, असेही आवाहन निवृत्तीराव सांगवे यांनी केले आहे.
लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्यात किंवा ग्रामीण परिसरात कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही, किंवा समाजासाठी कोणतेही कार्य केले नाही. आता निवडणुका आल्यामुळे त्यांना समाजाची आठवण झाली आहे, मात्र आता समाज देखील समजदार होऊ लागला आहे. अशा संधी साधू नेत्याला वेळीच जागा दाखवण्याची हीच सुवर्णसंधी आहे. पूर्ण खासदारकीचा कार्यकाळ हा निष्क्रिय राहिल्यामुळे उमेदवारीसाठीच मारामारी चालू असताना सरळ प्रचाराचा घाट घातला जातो आहे, आणि त्यासाठी बौद्ध धम्म परिषदेचे नाटक रचून भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करण्याचे पाप त्यांनी चालवले आहे. असाही आरोप निवृत्तीराव सांगवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच बुद्धिजीवी नागरिकांनी अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.