बूथ सक्षम करा, माणसे जोडा – ना. जयंत पाटील

बूथ सक्षम करा, माणसे जोडा - ना. जयंत पाटील

उदगीर (अॅड. एल.पी. उगीले ) : विकासाचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला माणसं जोडावी लागतील म्हणून बुथ सक्षम करा. वैचारिक सैन्य सोबत असेल तर आपला पराभव कोणीही करू शकत नाही. असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍ यानिमित्त उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होते. ”राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांना खा. शरद पवारसाहेबांनी मंत्रीपद देऊ केले. एकप्रकारे हे उदगीर, जळकोट येथील कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. अनेक वर्ष या मतदारसंघाचा विकास खुंटलेला होता. त्याला गती देण्याचे काम आता महाविकास आघाडी करत आहे. उदगीर आणि अहमदपूर या विधानसभा मतदारसंघात बुथ कमिट्या मजबूत होत्या म्हणून आपल्याला हा विजय खेचून आणता आला”, असेही ना. जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आपण चालतो आहे. म्हणून तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला हवे. प्रत्येक आजाराचे आपणच औषध नाही. पण प्रयत्न करायला हवा, म्हणून प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही ना. जयंत पाटील यांनी केले. या आढावा बैठकीला सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आमदार व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, महम्मद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल खय्युम खान, नगराध्यक्ष असफर शेख, प्रदेश सरचिटणीस आशा भिसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निरीक्षक वसंत सुगावे, संजय शेट्टी, मराठवाडा निरीक्षक प्रज्ञाताई खोसरे, जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंगडे, युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका लद्दे हे उपस्थित होते.

About The Author