प्रहार जनशक्ती पार्टीच्या दणक्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्काची हातभट्टीवर धाड
उदगीर (एल. पी. उगिले) : प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांनी लातूर जिल्हाअधिकारी, उदगीर चे उपविभागीय अधिकारी यांना रीतसर निवेदन देऊन उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अवैध देशी दारू व हातभट्टीची दारू बंद करावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अवैध धंदे आणि अवैध देशी दारू, हातभट्टीची दारू बंद करण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र त्यालाही न जुमानता अवैध दारू विक्री चालूच होती.
एका अर्थाने वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने प्रहार चे विनोद तेलंगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा अर्ज फाटे केले होते. त्याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाला जाब विचारला होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या वतीने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातील अनेक वाडी, तांड्यावरील गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या अड्यावर संयुक्तरित्या धाडी टाकल्या. यामध्ये चार हजार 100 लिटर दारूचे उत्पादन करण्यासाठी आणले गेलेले गुळ मिश्रित रसायन आणि 74 लिटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण एक लाख 96 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सात जणाविरुद्ध रीतसर गुन्हेही नोंदवण्यात आले.
होळीच्या आणि धुळवड, रंगपंचमी च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टीची विक्री होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क व उदगीर ग्रामीण पोलिसांनी पथक बनवून तालुक्यातील कोळखेड तांडा व नागलगाव परिसरातील मारुती तांडा या ठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू बनवण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी रसायन आणि हातभट्टीची दारू आढळून आली. रसायन नष्ट करून इतर साहित्य जप्त करण्यात आले असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या धाडीमध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक एन पी रोडे, आर के मुंडे, गणेश गोळे, कर्मचारी जे आर पवार, एस जी बागलवाड, पोलीस हवालदार नामदेव धुळशेट्टे, नाना शिंदे, एन एस चेवले, रवी फुलारी यांच्यासह महिला पोलीस पथकही सहभागी झाले होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, उदगीर तालुका अध्यक्ष रवी बेळकोने यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ही कारवाई अशीच चालू राहिली तर या प्रकाराला आळा बसू शकेल, अन्यथा पुन्हा, “येरे माझ्या मागल्या, कालच्याच ताक कण्या चांगल्या” असे म्हणायची दुर्दैवी वेळ उदगीर विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेवर येऊ शकेल, अशी चर्चा चालू आहे.