इंस्टाग्राम वर दहशत पसरवणाऱ्या रील प्रसारित केल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (एल. पी. उगीले) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने दक्ष राहण्याचे आदेश लातूर जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच समाज माध्यमावर देखील काळजीपूर्वक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करत उदगीर शहरातील एक व्यक्ती आणि ग्रामीण भागातील एक व्यक्ती यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून हाती आलेली माहिती अशी की, इंस्टाग्राम या समाज माध्यमावर अमोल सुधाकर बिरादार (रा. वलांडी तालुका देवनी जिल्हा लातूर) याने चित्रफीत तयार करून ती प्रसारित केली होती. त्या चित्रफितीत घातक हत्यार हातात घेऊन ही चित्रफित बनवण्यात आली होती. अशा चित्रफितीतून दहशत निर्माण करण्याचा उद्देश असू शकतो, असे गृहीत धरून अमोल सुधाकर बिरादार यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम कलम 4, 25 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यास उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालया जवळ अटक करण्यात आली आहे. याच प्रमाणे राजकुमार ज्ञानोबा आलावाड (रा. गोपाळ नगर उदगीर) यांनीही अशाच पद्धतीचे फोटो इंस्टाग्राम वर ठेवून समाज माध्यमात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या घरून दोन तलवारी व एक कोयता जप्त करण्यात आला आहे. तसेच राजकुमार ज्ञानोबा आलावाड याच्याविरुद्धही भारतीय हत्यार अधिनियम कलम 4, 25 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाई मध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चेरले ,पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले यांनी कामगिरी बजावली. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरादार, गेडाम, राहुल गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
समाज माध्यमांचा योग्य वापर केला जावा. गैरवापर केला जात असेल तर पोलीस प्रशासन कदापि माफ करणार नाही. अशी चर्चा आता उदगीर शहरात आणि परिसरात चालू आहे.