नव मतदारांना नाव नोंदणीसाठी 9 एप्रिल पर्यंत मुदतवाढ – सुशांत शिंदे
उदगीर (एल. पी. उगिले) : येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पात्र असलेल्या नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिनांक 9 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्यांनी 9 एप्रिल पर्यंत आपली नाव नोंदणी केलेली आहे, त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार असल्याची माहिती उदगीरचे उपजिल्हाधिकारी तथा लोकसभा निवडणुकीतील मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली आहे.
ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत, आणि मतदार यादी मध्ये नाव नसलेल्या तरुणांसाठी व इतर नागरिकांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी मुदत वाढवून दिलेली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची दिलेली संधी विचारात घेऊन त्याचा फायदा घ्यावा. असेही आवाहन सुशांत शिंदे यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्पलाइन ॲप, एन व्ही एस पी, महा-ई-सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून नव मतदारांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी. असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.