‘आता तरी जागा हो रे, मतदारराजा..’ पथनाट्यातून प्रशासनातर्फे जनजागृती
मलकापूर हायस्कूलचा पुढाकार
शाहूवाडी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती अभियान हाती घेतले आहे. या अनुषंगाने मतदार बंधू- भगिनींमध्ये जागृती व्हावी यासाठी तालुक्यातील मलकापूर हायस्कूल व श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजच्यावतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यानिमित्त विद्यालयातर्फे प्रभात फेरी, पथनाट्यसह अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सी-व्हीजिल अॅपबाबत माहिती देऊन निवडणूक आयोगाकडून निःपक्षपाती आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. यास्तव नागरिकांनी आयोगाच्या मोडस ऑपरेंडीवर (कार्यपद्धती), ईव्हीएमच्या मतदान प्रक्रियेवर अचल विश्वास ठेवून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे आणि भयमुक्त वातावरणात आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे सविनय आवाहन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ९ एप्रिल पर्यंत आयोगाने मुदतवाढ दिली असल्याने याही संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असेही श्री. पाटील म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रबोधनपर प्रभात फेरीने झाली. मलकापूर नगरीच्या मुख्य मार्गांवरुन काढलेल्या या प्रभात फेरीत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणारी घोषवाक्य लिहिलेली फलके हाती घेत विद्यार्थ्यांनी मतदारांची जागृती करणाऱ्या घोषणांनी परिसर निनादून सोडला. प्रा. शिवाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी 'आता तरी जागा हो रे, मतदारराजा' हे भन्नाट पथनाट्य मंगळवार पेठ, मुख्य बाजारपेठ, शिवतीर्थ परिसरासह जागोजागी सादर केले. शुभम पंडित पाटील, ओम विजय जाधव, स्वरुप विजय जाधव, ऋतुजा शिवाजी वारंग, वैष्णवी कृष्णा लोकरे, शारदा रवींद्र जोशी आदी विद्यार्थी-कलाकारांमार्फत पथनाट्य सादरीकरणातून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात आला. या पथनाट्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
तसेच गणेश शांताराम शेलार याने पोवाडा सादर करुन मतदान हा प्रत्येक भारतीयाला संविधानानुसार मिळालेला एक मूलभूत अधिकार आहे. आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी व चांगले प्रशासन येण्यासाठी मतदान करायला हवे असे नम्र आवाहन केले. श्रावणी विनायक कुंभार, वेदिका रंगराव बोटांगळे, यश प्रकाश सायनेकर यांनी 'तोच देश होईल महान, ज्या देशात शंभर टक्के मतदान' असा संदेश चित्ररुपाने दिला. सनम इब्राहिम जेठी, श्रेया विलास खबाले, ऋतिका संदीप पाटील, झेबा रमजान हवालदार यांची उत्कृष्ट भाषणे झाली. कोमल आनंदा बागम, वैष्णवी विलास कुंभार, पुनम संजय पाटील, प्रियांका पांडुरंग डाकरे, निशा तानाजी पाटील या विद्यार्थिनींनी 'मी माझे मत विकणार नाही', 'मी नव्या युगाची मतदार', 'उत्सव लोकशाहीचा - जागर मताधिकाराचा' या विषयांवर प्रभावी निबंधलेखन केले. सानिका मारुती तावडे, मधुरा विजय देसाई, आदिती जॉनी कांबळे यांनी ७ मे रोजी सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाहीच्या या राष्ट्रीय उत्सवात आनंदाने सहभागी व्हावे अशा आशयाचा संदेश आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून दिला. शिवाय स्वाक्षरी मोहीम, मॅजिकल चिठ्ठी, मतदान प्रतिज्ञा हे उपक्रम देखील 'स्वीप' चे आकर्षण ठरले. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठा सहभाग घेतला. एकूणच मतदार जागृतीसाठी विद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आणि जनतेला मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदानासाठी प्रेरित करण्यात आले.
तहसीलदार रामलिंग चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र मोरे, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, केंद्रप्रमुख संजय मदने, प्राचार्य व्ही. बी. साठे, उपप्राचार्य डी. वाय. कुराडे, पर्यवेक्षक एस. व्ही. कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिवाप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही. व्ही. नायकवडे, प्रा. वाय. एम. शिंदे, प्रा. पूर्वा खोत, प्रा. एस. वाय. इंदापूरे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. पी. व्ही. कदम, हरिष प्रधान, एस. व्ही. पारळे, आर. आर. गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.