जवळगा येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान मद्यपींचा गोंधळ !! अवैध धंद्याला पोलिसाकडूनच तर मिळत नाही ना बळ ?
देवणी (लक्ष्मण रणदिवे) देवणी तालुक्यात सध्या अवैध धंद्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. परिणामतः मटका, गुटखा, जुगार याला अत्यंत चांगले दिवस येऊ लागले आहेत. यासोबतच अवैध दारू विक्रीने ही चांगलाच विक्रम केला आहे. अशा अवैध धंद्याला आळा घालने गरजेचे आहे. सामाजिक जाणीव जपत पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
मात्र जनतेच्या मागणीला कोलदांडा देऊन, पोलीस प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे किंवा अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगभले म्हणायची वेळ आली आहे. अवैध धंद्यामध्ये प्रामुख्याने अवैध दारू विक्री ही समाजातील प्रतिष्ठित माणसाची डोकेदुखी ठरली आहे. इतर वेळेस ची गोष्ट वेगळी, मात्र देवणी तालुक्यातील जवळगा या मोठ्या गावात सध्या हरिनाम सप्ताह चालू आहे. भाविक, भक्त मोठ्या संख्येने आजूबाजूच्या तालुक्यातील गावातून जवळगा येथे येत आहेत, आणि हरिनाम सप्ताहाचा फायदा घेत आहेत. मात्र या दरम्यान गावातील मद्यपी सप्ताहाच्या ठिकाणी येऊन गोंधळ घालून अनेक भाविक भक्तांच्या भावना दुखावत आहेत. त्यांना जर कोणी सांगायला गेले तर त्यांची अरेरावी आणि दादागिरी सहन करण्याची वेळ या भक्तावर येऊ लागली आहे.
इतर वेळी अवैध दारू मोठ्या प्रमाणात गावोगावी जरी विक्री होत असली तरी, किमान अशा मोठ्या कार्यक्रमात कोणता गोंधळ होऊ नये. किंवा मद्यपीकडून भाविक भक्तांना त्रास होऊ नये. याची जाण आणि भान पोलीस प्रशासनाने ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोक येत असताना त्यांना अशा मद्यपी लोकांचा अडथळा आणि त्रास सहन करावा लागत आहे.
“नंगे से खुदा डरे” म्हणतात, त्याप्रमाणे अशा मद्यपीच्या नादाला कोणी लागत नसल्याने, पोलीस प्रशासनातील काही अति हुशार कर्मचारी, उघड उघड आमच्याकडे तक्रारच नाही तर आम्ही काय म्हणून कारवाई करणार? अशा पद्धतीची बौद्धिक दिवाळखोरी दाखवत आहेत. हे सर्व रोखून देवणी तालुक्यातील अवैध धंदे रोखावेत आणि या अवैध धंद्यापासून होणारा सर्वसामान्य माणसाला त्रास कमी व्हावा. अशी रास्ता अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवणी येथे यापूर्वीच्या पोलिस अधिकाऱ्यांचा चांगला ठसा उमटलेला आहे. मात्र नवीन अधिकारी आले की, अवैध धंदेवाल्याचे “चांगभले!” म्हणण्याची वेळ येत असते. हे थांबले पाहिजे, नवीन अधिकाऱ्यांनी देखील अत्यंत कर्तबगारी दाखवत सर्वसामान्य नागरिकांना कसलीही चूक नसताना इतर लोकांकडून त्रास सहन करावा लागू नये. याचीही काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी. अशा पद्धतीची रास्त अपेक्षा अनेक गावच्या भाविक भक्तांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली आहे.