शाहूवाडी (प्रतिनिधी) : मलकापूर येथील रयत शैक्षणिक संकुलात बुधवार (ता. २७) रोजी न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका विधी सेवा समिती व वकील संघातर्फे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. मुलींना शालेय जीवनातच कायद्याविषयीचे जुजबी ज्ञान मिळावे म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य व्ही. बी. साठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मलकापूरच्या न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एस. देशमाने यांच्या स्वागत व परिचयाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले.
यावेळी न्यायाधीश अमोल शिंदे यांनी बालविवाह, स्री भ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, ॲसिड हल्ले, कौटुंबिक हिंसाचाराच्या अशा विकृतीचे उच्चाटन करण्यासाठी कायद्याचे महत्व यावर श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनींशी हितगुज केले. यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय संविधानाने महिलांना सुरक्षितता आणि समानतेचा हक्क दिला आहे. मुलींनी कायद्याची माहिती प्राप्त करून सजग व्हावे आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन न्यायाधीश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून केले. दरम्यान ॲड. अर्चना पवार यांनी कायद्यांतर्गत महिलांचे हक्क व अधिकार तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात नागरिकांसाठी कायद्याची आवश्यकता आणि कायद्यातील वकिलांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. ॲड. सावित्री सपाटे यांनी मुलींनी शाळेत आपल्या शिक्षिका आणि कुटुंबात पालकांशी सुसंवाद साधण्याची गरज व्यक्त केली. मुलींनी चांगले आचरण ठेवून आदर्श जीवन पद्धतीचा अवलंब करावा याविषयी भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचा समारोप उपप्राचार्य दत्ताजीराव कुराडे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. महिला व त्यांचे अधिकार तसेच 'निर्भय कन्या' यावर आधारित या एकदिवसीय शिबिरामध्ये तुकाराम डोंगरे व अन्य न्यायालयातील कर्मचारी, महिला शिक्षिकांसह विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. एम. पोवार, प्रा. जी. ए. रेंदाळे, प्रा. ए. आर. शिंदे, प्रा. वाय. एम. शिंदे, यशवंत सागावकर, बाजीराव दिंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.